त्रस्त कुटुंबीयांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : कडोली येथील शेतजमिनीचा वारसा करताना कोणत्याच नियमाचे पालन करण्यात आले नाही. बेकायदेशीररित्या जमीन वारसा करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कडोली ग्रामस्थांतर्फे निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. कडोली येथील रहिवासी मृत कृष्णा ओमाणी पाटील यांच्या नावाने असणारी जमीन सर्व वारसदारांच्या नावे न करता केवळ पुतण्याच्या नावे केली आहे. यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांवर अन्याय झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प़ृष्णा ओमाणी पाटील हे मृत झाले आहेत. त्यांच्या पश्चात चार मुले व दोन मुली आहेत. यामधील कृष्णा यांचा तीन क्रमांकाचा मुलगा दिवंगत बाबू कृष्णा पाटील यांचा मुलगा संतोष याच्या नावे सर्व जमीन करण्यात आली आहे. उर्वरित वारसांच्या नावे कोणतीच जमीन करण्यात आलेली नाही. सर्व्हे क्रमांक 498/4 मध्ये सदर प्रकार घडला असून ही बेकायेदशीर नोंद आहे. या प्रकरणामध्ये गावपातळीवरील अधिकारी कारणीभूत आहेत. याची त्वरित चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी व न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चौकशी करण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी भावकाण्णा पाटील, मारुती पाटील, शंकर पाटील, तुळसाबाई कडेमनी, जनाबाई अधिकारी, शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई आदी उपस्थित होते.









