प्रतिनिधी,गडहिंग्लज
Kolhapur News : गडहिंग्लजला अवैध धंद्यांची रेलचेल वाढली आहे.शहरतील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत.त्याही पलीकडे जाऊन बसस्थानकावर वृध्दाचे 40 हजारांचे पाकीट मारण्याबरोबरच बुधवारी बसस्थानकावर दिवसाढवळ्या एसटीत शिरून कोयत्या हल्ला करण्याच्या घटनेपर्यंत संशयीत गुन्हेगारांची मजल गेल्याने खळबळ उडाली आहे.शहरातील सर्वच मार्गावर वडापवाल्यांनी आपले पाय पसरले आहेत.शहरातील वाढते प्रकार पाहता खाकीचा धाक कमी झाला आहे की काय ?असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
गडहिंग्लजला अवैध धंद्याचे पेव फुटल्याचे अलिकडच्या घटनेवरून पहावयास मिळते आहे.गांजांची राजरोज विक्रीचा प्रकार उघड झाला आहे.त्याही पलीकडे हेब्बाळला गाजांची शेती करणाऱ्या दोघा शेतकऱ्यांवर कारवाई कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन पथकाने केली होती.गडहिंग्लजच्या पोलीसांना हाकेच्या अंतरावरची गांजाच्या शेतीची माहिती मिळाली नाही याचे आश्चर्य त्यावेळी जनतेतून व्यक्त होत होते.आतातर गडहिंग्लजला मटक्याचे पेव फुटले आहे.गल्लीबोळात मटका घेणाऱ्यांची चलती आहे.बसस्थानकाच्या परिसरात तर या मटक्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत मोठी गर्दी असते.मटका घेणाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याच्या संयशयाने बिनदिक्कत अगदी उघड्यावर मटका घेतला जातो आहे.या मार्गावरून शाळांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असतानाही त्याकडेही दुर्लक्ष करत मटक्याचा धंदा फोफावत असल्याचे दिसते आहे.मटका फोफावल्यामुळे सीमाभागातील बहुसंख्येने फंटर गडहिंग्लजला येताना दिसत आहेत.अलीकडे दोन महिन्यात मटक्याला उत आल्याने संपप्त प्रतिक्रीया नागरिक व्यक्त करत आहेत.या रस्त्याने पोलीस फिरत असूनही त्यांना दिसत नाही याचे ‘अर्थ’कारण जनता शोधत आहे.
शहरात गजबजलेल्या ठिकाणी नेहमी पोलीस बंदोबस्त ठेवला जात होता.बसस्थानक,शिवाजी पुतळा,वीरशैव चौक,मार्केट यार्ड,महाविद्यालयांचा परिसर येथे पोलीसांचे दर्शन होत होते.त्यामुळे दंगेखोरांवर काहीसा वचक होता.पण अलीकडे या सर्वच ठिकाणी पोलीस दिसणे दुरापास्त झाले आहे.त्याचा फायदा अवैध धंदे करणाऱ्यांनी उचलल्याची चर्चा आहे.कायम गजबजलेल्या बसस्थानकावर एसटी शिरून कोयता हल्ला झाल्याचा प्रकार बुधवारी घडला. शहरात अशी घटना प्रथमच घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली.पण कारवाईसाठी बराच वेळ लागल्याने यातून अवैध धंदेवाल्याचे फावत चालले आहे.गेल्या आठवड्यात कौलगेच्या वृध्दाचे घरसाहित्यासाठी बँकेतून काढलेले 40 हजार ऊपये अज्ञाताने एसटीत चढताना चोरून नेले.त्याचाही छडा लावण्यास पोलीसांना अद्याप यश आले नाही.बसस्थानकावर पोलीस असते तर या दोन घटनांना आळा बसला असता.पण बंदोबस्तच नसल्याने फावले आहे.शहराच्या सर्वच रस्त्यावर वडापवाल्यांचा जोर वाढला आहे. त्यांच्यावरील कारवाईचे अलिकडे कोणतेच वृत्त ऐकीवात नाही.बेकायदेशीर धंद्यांची कमान असतानाही ‘वर्दी’चे होणारे दुर्लक्ष चिंतेचा विषय झाला असून खाकीचा धाक संपलाकी काय ? असा प्रश्न सामान्य नागरिक चर्चेतून उपस्थित करताना दिसतो. शहरातील अवैध धंदे बंद करत कायदा व सुवस्था पूर्ववत करण्यासाठी पोलीसांनी आता तरी आपला धाक दाखवत वचक निर्माण करावा अशी मागणी होते आहे.