पंचायतीची धडक कारवाई : रितसर परवानगी घेऊन फलक लावण्याची सूचना : साबांखा प्रशासनाचे दुर्लक्ष
मोरजी : मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात लावलेले बेकायदा जाहिरात फलक हटविण्याची कारवाई मोरजी पंचायतीने सुरू केली आहे. कोणताही ना हरकत दाखला तसेच पंचायत करही न भरता हे फलक लावून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न व्यावसायिकांनी केला. त्या विरोधात वेळोवेळी मोर जी ग्रामसभेमध्ये अनेक ग्रामस्थांनी बेकायदेशीर फलक हटवावेत, हे फलक वाहन चालकांना आणि इतर नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याचे तक्रारी होत्या. त्यात तक्रारीची दखल घेऊन मोरजी पंचायतीने संबंधित फलक हटविण्याची मोहीम राबवलेली आहे. घटनास्थळी उपसरपंच पवन मोर्जे, पंच मुकेश गडेकर पंचायत सचिव उपस्थित होते. पंचायत कर्मचाऱ्यांकडून हे फलक हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. या जाहिरात फलकाच्या विरोधात वेळोवेळी ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केले. ज्यांना फलक लावायचे असेल त्यांनी पंचायतीची रितसर कायदेशीर परवानगी घेऊन लावावे,. अडगळीत आणि रस्त्याला किंवा नागरिकांना त्रासदायक ठरतील, असे फलक आम्ही लावू देणार नाही, असा इशारा यावेळी उपसरपंच पवन मोरजे यांनी दिला.
साबांखा रस्ता विभागाकडून कानाडोळा!
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाकडे जागा संपादित करून सरकारने दिलेली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाच्या अधिकाऱ्यांचे पूर्णपणे याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण सुरू आहेत. आणि या अतिक्रमणावर आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याने कसल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही, अशी माहिती यावेळी पंचायतीतर्फे देण्यात आली. मोरर्जी पंचायतीने यापूर्वीच रस्ता विभाग, उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांना निवेदन सादर करून ज्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याशेजारी सरकारी जमिनीत अतिक्रमण सुरू आहेत. ती जागा अगोदर सुरक्षित करावी आणि ज्यांनी कुणी अतिक्रमण केले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन यापूर्वीच पंचायतीने संबंधित खात्याला सादर केले आहे.









