मडगाव : काँग्रेस पक्षाने शुक्रवारी मडगावात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सत्ताधारी सरकारवर बेकायदेशीररित्या गोव्यात येत असलेल्या शस्त्रास्त्रासंबंधी आरोप केले आणि या प्रकरणात गृहमंत्र्यानी जातीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. माजी जिल्हा पंचायत सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे एक पदाधिकारी मॉरिन रिबेलो यांनी मडगावातील काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषेदेत सातत्याने दक्षिण गोव्यात होत असलेल्या गोळीबारासंबंधी चिंता व्यक्त केली आणि अशा प्रकारची शस्त्रे संशयितांकडे येतातच कशी असा सवाल केला. यावेळी कुडतरी महिला अध्यक्षा लिओना बार्रेटो, कुडतरी गट काँग्रेस अध्यक्ष मिलाग्रीस रॉड्रिग्स तसेच जिल्हा पंचायतसदस्य मिशेल रिबेलो यावेळी उपस्थित होत्या. कुडतरी हा एक शांत गाव. या गावात सध्या गुन्हेगारीची प्रकरणे वाढू लागलेली आहेत. अनेक प्रकारच्या गुन्हेगारी घटना होत आहेत. मालमत्तेच्या वादामुळे यापूर्वीही अशा प्रकारचे अनेक गुन्हे कुडतरी गावात घडलेले आहेत. अशा गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कडक कारवाई झाली असती तर बुधवारी मध्यरात्रीच्यावेळी झालेले गोळीबाराचे प्रकरण झाले नसते असेही ते म्हणाले.
मायणा कुडतरी पोलिसांनी प्रामाणिकपणे हे प्रकरण हाताळून सर्व गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करावी. ज्या जागी गोळीबार करण्यात आलेला आहे ती एकांतवासातील जागा आहे. तेथे ज्यादा घरे नाहीत. गुन्हा करुन पळून जाण्यासाठी ती एक चांगली जागा आहे. ज्या घरावर गोळीबार करण्यात आला त्या घरातील व्यक्ती सध्या भीतीनेच जगत आहेत. त्यांच्या मनात सतत धडकी भरलेली आहे असे श्री. रिबेलो यांनी सांगितले. गुन्हेगारीचा ठपका असलेली काही मंडळी सध्या लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असतात. त्यातील काही मंडळी पंचायतीतही सध्या आहेत आणि ही बाब चांगली नव्हे, ते म्हणाले. मे 2023 पासून दक्षिण गोव्यात गोळीबाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. बंगल्यात चोरी करण्यासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील आरोपीकडून पोलिसांवर केलेले साकवाळ येथील गोळीबाराचे प्रकरण, दोन महिन्यापूर्वी मडगावात खुले आम झालेले गोळीबाराचे प्रकरण. गोव्यात बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रांचा व्यवहार होत असल्याचा आरोप लिओना बार्रेटो यांनी केला आणि हे प्रकार नियंत्रणात आले पाहिजे अशी मागणी केली.
संशयिताला 3 दिवसांची कोठडी
रायतळे कुडतरी येथे झालेल्या गोळीबाराप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या निलेश वेर्णेकर याना शुक्रवारी पोलिसांनी न्यायालयापुढे उभे केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला. या प्रकरणातील इतर दोन संशयिताच्या मागावर पोलीस आहेत.









