वृत्तसंस्था/ रोम
रविवारी येथे झालेल्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत कझाकस्तानच्या इलिना रिबाकिनाने एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. 2023 च्या टेनिस हंगामातील रिबाकिनाचे हे दुसरे विजेतेपद आहे.
या स्पर्धेतील रविवारी रिबाकिना आणि अॅनेलिना कॅलिनिना यांच्यात हा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात रिबाकिनाने पहिला सेट 6-4 असा जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये रिबाकिनाने 1-0 अशी आघाडी घेतली असताना कॅलिनिनाने दुखापतीमुळे माघार घेतली. कॅलिनिनाच्या डाव्या पायाच्या मांडीला दुखापत झाल्याने तिने हा निर्णय घेतला. तसेच या अंतिम सामन्यावेळी पावसाचा अडथळाही आला होता. गेल्या वर्षी चार्लस्टन स्पर्धेत रिबाकिनाने कॅलिनिनाचा पराभव केला होता.

या स्पर्धेतील विजेतेपदामुळे आता रिबाकिना महिला टेनिसपटूच्या ताज्या मानांकन यादीत चौथ्या स्थानावर राहिल. रिबाकिनाने गेल्या जानेवारीत ऑस्ट्रेलिय ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. तसेच 2023 च्या टेनिस हंगामात तिने डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाच्या 2 स्पर्धा जिंकल्या आहेत. रिबाकिनाने यावेळी इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा जिंकली होती.









