समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे मत : रिवण भागात येणाऱ्या प्रकल्पाचे सर्वांनी स्वागत करावे
सांगे : सांगे तालुक्यातील रिवण ग्रामपंचायत क्षेत्रात आयआयटी हा शैक्षणिक प्रकल्प येत असून त्याचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. आयआयटीमुळे येत्या दहा वर्षांत सांगेचा कायापालट झाल्याचे दिसून येईल. रिवण ग्रामपंचायतीने आयआयटी पाहिजे म्हणून बिनविरोध ठराव संमत केलेला आहे. एक उत्तम निर्णय रिवण ग्रामपंचायतीने घेतलेला आहे, असे सांगेचे आमदार आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. केवळ विरोधासाठी विरोध होता कामा नये. कोठार्ली येथील जागा अपुरी पडल्याने आणि योग्य नसल्याने आता रिवण, मळे येथील जमिनीचे संपादन होणार आहे. त्यासाठी साडेदहा लाख चौ. मी. जमीन संपादित करण्यात येणार आहे. आयआयटीला 95 टक्के लोकांचा पाठिंबा आहे. आयआयटी आल्यास सांगे मतदारसंघाचा विकास होईल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे फळदेसाई म्हणाले. ज्या जमिनीत आयआयटी येणार आहे ती जमीन पडीक आहे. फक्त आठ हजार चौ. मी. जमिनीत पोफळी, काजू, माड आहेत. शक्य असल्यास एक तर ती जमीन सोडण्यात येईल किंवा त्यांना इतरत्र जमीन दिली जाईल. शिवाय नुकसान भरपाई देऊ. संबंधितांशी तशी बोलणी देखील झालेली आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले. शिवाय येथील लहान आकाराचे असलेले मंदिर मोठ्या स्वरुपात बांधून दिले जाणार आहे. लोकांना विश्वासात घेऊनच सर्व काही केले जाईल. कुणीही संभ्रमात राहू नये. रिवण व कावरेपिर्ला ग्रामपंचायतींच्या सीमेवर ही जमीन असून यापूर्वीच दोन्ही ग्रामपंचायत मंडळे आणि स्थानिकांना पूर्ण कल्पना देऊन विश्वासात घेतलेले आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले. दोन्ही पंचायतींनी आयआयटी प्रकल्पाला आपली सहमती दर्शविली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आपमतलबी लोकांपासून सावध राहावे
सांगेवासियांनी सर्व काही दिले आहे. साळावलीचे पाणी सांगेतून पुरविले जाते, खनिजातही हा भाग पुढे आहे. सांगेवासियांचे गोव्याच्या विकासात मोठे योगदान आहे. खाणी चालू झाल्या पाहिजेत असे लोक म्हणतात. कारण त्यावर अनेक जण अवलंबून आहेत. आयआयटी आल्यानंतर स्थानिकांना रोजगार मिळतील. आयआयटीसाठी एवढी मोठी जमीन का हवी असे म्हणणाऱ्यांनी नेत्रावळीत जी 25 ते 40 लाख चौ. मी. जमीन विकण्यात आली त्यावर बोलावे. गावकऱ्यांनी आपमतलबी, स्वत:चा स्वार्थ पाहणाऱ्या आणि साटेलोटे असणाऱ्या लोकांपासून सावध राहावे, असे आवाहन फळदेसाई यांनी केले. रिवण येथील प्रगतशील आणि पुरस्कारप्राप्त शेतकरी पांडुरंग पाटील यांनी आयआयटी व्हावी म्हणून स्पष्ट मत मांडले आहे. त्याचे मी स्वागत करतो, असे फळदेसाई यांनी सांगितले. आयआयटीमुळे बाजारपेठ सुधारेल, स्थानिकांना लहान-मोठी कामे मिळतील. सुमारे दोन हजार कोटींच्या साधनसुविधा निर्माण होतील. आयआयटीसंदर्भात स्थानिकांना शंका असल्यास त्यांनी आपणाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.









