कलकत्ता उच्च न्यायालयात सुनावणी ः
वृत्तसंस्था/ कोलकाता
आयआयटी खडगपूरमधील विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. सत्य समोर आणण्यासाठी विद्यार्थ्याचा मृतदेह कब्रमधून बाहेर काढत पुन्हा शवविच्छेदन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे. उच्च न्यायालयाने याकरता तपास अधिकाऱयांना एक महिन्याची मुदत दिली आहे.
23 वर्षीय फैजान मागील वर्षी 14 ऑक्टोबर रोजी वसतिगृहातील खोलीत मृतावस्थेत आढळून आला होता. फैजानने आत्महत्या केल्याचे आयआयटी प्राधिकरणाकडून सांगण्यात आले होते. तर फैजानची हत्या करण्यात आल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. कुटुंबीयांनी फैजानच्या मृतदेहावर दुसऱयांदा शवविच्छेदन करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाला संमती दर्शविली आहे.
विद्यार्थ्यावर आसाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. फैजान अहमदचा मृतदेह कब्रमधून बाहेर काढण्याचा आदेश देत आहोत. याप्रकरणी तपास अधिकाऱयांनी आसाम पोलिसांसोबत समन्वय साधून नव्याने शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया पार पाडावी असे न्यायाधीश राजशेखर मंथा यांनी स्वतःच्या आदेशात म्हटले आहे.
न्यायालयाने न्यायमित्र संदीप भट्टाचार्य यांच्याकडून दाखल अहवालाचा उल्लेख केला आहे. मृताच्या डोक्यावर जखमेच्या दोन खुणा होत्या, या खुणांना वैद्यकीय भाषेत हीमाटोमा म्हटले जाते. पहिल्या शवविच्छेदन अहवालात याचा उल्लेख नव्हता असे न्यायमित्र भट्टाचार्य यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच पोलिसांना घटनास्थळावरून एम्प्लूरा (सोडियम नायट्रेट) नावाचे रसायन मिळाले होते. हे रसायन मांस ताजे ठेवण्यासाठी वापरले जाते. वसतिगृहाच्या एका खोलीत मृतदेह सडत राहिला असताना अन्य खोल्यांमधील विद्यार्थ्यांना याचा थांगपत्ताही लागला नव्हता. अशा स्थितीत या रसायनाचा वापर करण्यात आला असावा असा संशय आहे.









