समुद्रात उडी घेत संपविले स्वत:चे आयुष्य
वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम
आयआयटी-हैदराबादच्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने कथितपणे विशाखापट्टणम येथील समुद्रात उडी घेत स्वत:चे जीवन संपविले आहे. स्वत:चे दोन विषय राहिल्याने हा विद्यार्थी तणावाखाली होता अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे. धनवथ कार्तिक 19 जुलैच्या आसपास समुद्रात बुडाला असावा, मच्छिमारांच्या मदतीने 20 जुलै रोजी त्याचा मृतदेह हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
धनवथचा मोबाइल 19 जुलै रोजी विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीचवर अॅक्टिव्ह होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार त्याला समुद्र किनाऱ्याच्या धोकादायक क्षेत्रात चालताना पाहिले गेले होते असे विशाखापट्टणमचे पोलीस आयुक्त सी.एम. त्रिविक्रम वर्मा यांनी सांगितले आहे.
कार्तिकने 17 जुलै रोजी हैदराबाद सोडले होते. परीक्षांमध्ये बॅकलॉग क्लियर न करता आल्याने तो तणावात होता. 17 जुलै रोजी कार्तिक बेपत्ता असल्याचे आढळून आले होते. ज्यानंतर आयआयटी हैदराबादच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. कनवथ हा तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील रहिवासी होता.









