एनआयआरएफ’ क्रमवारी-2024 : विद्यापीठे-महाविद्यालयांची नवीनतम रँकिंग जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, कायदा आणि इतर महाविद्यालयांची नवीनतम क्रमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सोमवारी जाहीर केली. मंत्रालयाने शेअर केलेल्या माहितीनुसार, आयआयटी मद्रासने सर्व विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुपारी 3 वाजता विविध श्रेणींमध्ये (एनआयआरएफ ओव्हरऑल रँकिंग 2024) टॉप कॉलेजची रँकिंग जाहीर केली. त्यानंतर सदर यादी अधिकृत वेबसाईट हग्rग्ह्गि्a.दु वर प्रकाशित करण्यात आली.
2015 पासून दरवषी शिक्षण मंत्रालयाकडून उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर केली जाते. मंत्रालयाने ठरवून दिलेल्या विविध पॅरामीटर्सच्या आधारे ही रँकिंग कॉलेजांना दिली जाते. या मानकांमध्ये शिक्षण संसाधने, संशोधन आणि व्यावसायिक सराव, पदवीचे परिणाम, शैक्षणिक गुणवत्ता आणि धारणा यांचा समावेश आहे. हे रँकिंग गेल्या महिन्यात जुलै 2024 च्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार होते, परंतु यावेळी लोकसभा निवडणुकीमुळे उशीर झाला आहे.
विद्यापीठांमधील क्रमवारीत चेन्नईस्थित आयआयटी मद्रासने पहिले स्थान पटकावले आहे. तर, आयआयएससी बेंगळूरने दुसरे आणि आयआयटी बॉम्बेने तिसरे स्थान मिळवले आहे. आयआयटी दिल्ली चौथ्या स्थानी असून कानपूर आयआयटी पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आयआयटी खरगपूर, नवी दिल्ली एम्स यांनी स्थान पटकावले असून दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयु) दहाव्या स्थानी आहे.
‘टॉप 10’ कॉलेजमध्ये दिल्लीची आघाडी
देशातील सर्वोच्च महाविद्यालयांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. एनआयआरएफ रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत यंदा दिल्लीतील हिंदू कॉलेज पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दिल्लीतील मिरांडा हाऊस (दुसरा) आणि सेंट स्टीफन्स कॉलेज (तिसरा) क्रमांक लागतो. इतकेच नाही तर देशातील टॉप 10 महाविद्यालयांपैकी 6 कॉलेजेस फक्त दिल्लीतील आहेत. याशिवाय इतर चार महाविद्यालयांमध्ये कोलकाता, कोईम्बतूर, चेन्नई या महाविद्यालयांचा समावेश आहे. कोलकाता येथील राम कृष्ण मिशन विवेकानंद शताब्दी महाविद्यालय चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्लीतील आत्माराम सनातन धर्म महाविद्यालय पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीत दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमन दहाव्या स्थानी आहे.









