गणेशोत्सव बंदोबस्तावर नजर ठेवणार : पोलीस आयुक्त बोरसे यांच्याकडूनही संपूर्ण तयारी
बेळगाव : गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलीस दलाने व्यापक तयारी केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी तर अल्पावधीत बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे. आता राज्य सरकारने यासाठी आणखी दोन आयपीएस अधिकारी दिले असून एकूण बंदोबस्तावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य राखीव दलाचे आयजीपी संदीप पाटील यांच्यावर जबाबदारी दिली आहे. संदीप पाटील यांनी जिल्हा पोलीसप्रमुख म्हणून उत्तमपणे व प्रभावीपणे सेवा बजावली आहे. सध्या ते राज्य राखीव दलात आहेत. पूर्वानुभव लक्षात घेऊन एकूण बंदोबस्तावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांची बेळगावला नियुक्ती करण्यात आली असून बुधवार दि. 3 सप्टेंबर रोजी ते बेळगावला येणार आहेत.
सध्या पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण बरमणी, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस यांच्यावर तर बंदोबस्ताची जबाबदारी आहेच. त्यांच्या मदतीला श्रीधर व रिष्यंत या दोन आयपीएस अधिकाऱ्यांना बेळगावला जाण्याची सूचना राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शांतता समितीची बैठक व प्रत्यक्ष गाठीभेटींच्या माध्यमातून तुम्ही शांततेत सण साजरा करा, यासाठी आम्ही आहोत, असा संदेश गणेशभक्तांना दिला आहे. बंदोबस्तासाठी जलद कृती दलाची एक तुकडीही बेळगावात दाखल झाली असून रोज वेगवेगळ्या परिसरात पथसंचलनही करण्यात येत आहे.









