शॅडो कौन्सिलची टीका : महत्त्वाची कागदपत्रे-नोंदींना धोका, मोठ्या दुरुस्तीची गरज, ‘जीसुडा’कडे पाठविलेला प्रस्ताव रखडला
मडगाव : मडगाव पालिकेच्या प्रतिष्ठित व वारसा इमारतीकडे दुर्लक्ष होत आहे हे खरोखरच अत्यंत निराशाजनक आहे. आम्हाला आश्चर्य वाटते की, नगराध्यक्ष, नगरसेवक, पात्र अभियांत्रिकी कर्मचारी हे सारे इमारतीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करून त्यातील कार्यालयात कसे पाऊल टाकतात, असे शॅडो कौन्सिलने म्हटले आहे. हे सर्व मन अस्वस्थ करणारे आहे. त्यामुळे हा मुद्दा वारंवार उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांना जागे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ते आवश्यक उपाययोजना करतील या आशेने आम्ही प्रयत्न करतो. 2019 पासून आम्ही पालिका इमारतीची रंगरंगोटी करण्याकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधत आलो आहोत. परंतु ते सर्व व्यर्थ ठरले आहे. दरवर्षी मे ते जुलै महिन्यादरम्यान कुठे ना कुठे प्रत्येक नगराध्यक्ष दिवाळीपूर्वी इमारतीला रंगरंगोटी करण्यात येईल अशी घोषणा करत असतो. परंतु 2019 पासून अनेक वेळा दिवाळी साजरी होऊन गेली. मात्र रंगरंगोटी प्रत्यक्षात उतरलेली नाही, याकडे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी लक्ष वेधले आहे.
आजच्या घडीला फक्त रंगरंगोटी करून काही फायदा होणार नाही. एकंदर दुर्लक्षामुळे पालिकेच्या इमारतीला मोठ्या दुऊस्तीची गरज आहे. दुऊस्तीचा प्रस्ताव पालिकेकडून ‘जीसुडा’ कार्यालयाकडे पाठविला गेला असला, तरी तो रखडला आहे आणि यासंदर्भात कोणताही निर्णय होताना दिसत नाही. पालिकेने इमारतीच्या देखभालीची जबाबदारी ‘जीसुडा’कडे सोपवली आहे. ‘जीसुडा’ने पालिकेला ‘टोकन’ रक्कम जमा करण्याची विनंती केली आहे. ती जमा करणे बाकी आहे, असा दावा कुतिन्हो यांनी केला आहे.
पालिका इमारतच धोक्यात नाही, तर अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि नोंदी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जन्म-मृत्यूच्या नोंदी पावसाच्या पाण्याने भिजल्या आहेत आणि त्या वाळविण्यासाठी ठेवल्या जात असल्याचे चित्र पालिकेत पाहायला मिळत आहे. या भिजलेल्या नोंदींमधील मजकूर वाचण्याजोगा राहील काय हा आणखी एक चिंतेचा विषय आहे. तो पालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी नाही, तर जनतेसाठी अधिक महत्त्वाचा आहे. कारण नोंदी नष्ट होण्याची भीती त्यांना भेडसावत आहे. या प्रकरणी हस्तक्षेप करून इमारत आणि तेथील नोंदी जतन करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असे आवाहन मडगाववासियांनी अधिकाऱ्यांना आणि विशेषत: जे पालिकेचे पदसिद्ध सदस्य देखील आहेत त्या तिन्ही आमदारांना केले आहे.









