लिलाव प्रक्रिया संशयाच्या भोवऱयात
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या मालकीचे गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. जुन्या भाडेकरूना लिज वाढवून देण्यासाठी लिलाव प्रपेयेत प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण लिजवाढीसाठी महिन्याआधी पत्र देवूनही याचा विचार करण्यात आला नसल्याची तक्रार गणपत गल्ली येथील गाळेधारकांनी केली असून लिलाव प्रक्रियाच मॅनेज केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारी करण्यात आलेली लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची मागणी होत आहे.
महापालिकेच्या व्यापारी गाळय़ांचा 12 वर्षाचा करार संपुष्टात आल्याने नव्याने भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र सध्याच्या भाडेकरूना लिज वाढवून हवी असल्यास पत्र देण्याची सूचना करण्यात आली होती. बोलीदरम्यान सर्वाधिक बोलीवर पाच टक्के अधिक भाडे आकारणी करून लिज वाढवून देण्यात येणार असल्याचे मनपाने निश्चित केले होते. याबाबत वृत्तपत्रामधून प्रकटन प्रसिद्ध केले होते. तसेच वैयक्तिक नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे अनेक गाळेधारकांनी लिजवाढीसाठी मनपाच्या महसूल विभागाकडे अर्ज केले आहेत. मात्र सदर पत्रांचा विचार शुक्रवारी करण्यात आलेल्या गणपत गल्लीतील गाळय़ांच्या लिलावावेळी केला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गणपत गल्ली शाळेतील गाळा क्रमांक दोनच्या गाळेधारकांनी लिजवाढीकरिता दि. 9 एप्रिल रोजी महापालिकेकडे अर्ज दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी लिलावावेळी बोली झाल्यानंतर प्रथम प्राधान्यक्रमाने गाळय़ांची मागणी केली. पण अर्ज मिळाला नसल्याचे सांगून मनपाच्या अधिकाऱयांनी प्राधान्य देण्यास नकार देवून बोलीवेळी सर्वाधिक बोली लावलेल्या गाळेधारकाला गाळा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनपाची लिलाव प्रक्रिया संशयाच्या भोवऱयात सापडली आहे.
लिज वाढवून देण्याची मागणी
लिजवाढीसाठी अर्ज देवून याकडे दुर्लक्ष करून मर्जीतील गाळेधारकांना गाळे देण्यात आल्याची टीका करण्यात येत आहे. तसेच गाळा क्रमांक एक भाडेतत्त्वावर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बोलीवेळी बोलीधारकांना बोली लावण्यासाठी वेळ न देता अंतिम घोषणा करून बोली थांबविण्यात आल्याची टीका होत आहे. सदर गाळे सध्याच्या गाळेधारकांना लिज वाढ करून देण्यात यावेत, अशी मागणी होत आहे..








