पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा : सरदार पटेल यांना वाहिली श्रद्धांजली
वृत्तसंस्था/ केवडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे जात देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केवडिया येथेच पटेल याचा 182 मीटर उंचीचा विक्रमी पुतळा असून याला स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हटले जाते. यानंतर झालेल्या कार्यक्रमात मोदींनी देशाची एकता आणि सार्वभौमत्वासोबत काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्याच्या मुद्द्यावर भूमिका मांडली. तुष्टीकरणाचे राजकारण करणारे लोक दहशतवादाच्या धोक्यामुळे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला आहे.
तुष्टीकरणाचे राजकारण करणारे लोक आज स्वत:च्या उद्दिष्टांमध्ये यशस्वी होत नसल्याचे दिसून येते. या तुष्टीकरण करणाऱ्या लोकांना दहशतवाद दिसून येत नाही. हा गट स्वत:च्या स्वार्थासाठी देशाच्या एकतेला धक्का पोहोचवत आहे. याचबरोबर हे लोक दहशतवाद्यांना वाचविण्यासाठी मध्यरात्री देखील न्यायालयाचे दार ठोठावत आहेत. आम्हाला अशा लोकांपासून सतर्क रहावे लागणार असल्याचे मोदी म्हणाले.
मागील 9 वर्षांमध्ये सर्वांचे प्रयत्न झाल्यास काहीच अशक्य नसल्याचे देशाचे पाहिले आहे. काश्मीर कधी कलम 370 पासून मुक्त होईल असा विचार कुणी केला होता. परंतु आज काश्मीर आणि देशामधील कलम 370 ची भिंत कोसळली आहे. सरदार पटेल हे जेथे कुठे असतील, त्यांना या गोष्टीचा आनंद होत ते आम्हाला आशीर्वाद देत असतील. काश्मीरचे युवा आता मोकळ्या हवेत श्वास घेत असून देशाच्या विकासात योगदान देत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
अनावश्यक कायदे हटविण्याचे सत्र
अमृतकाळात भारताने गुलामीची मानसिकता त्यागून वाटचाल करण्याचा संकल्प घेतला आहे. आम्ही विकास करत आहोत आणि आमच्या वारशाचे संरक्षणही करत आहोत. भारताने स्वत:च्या नौदलाच्या ध्वजावरील गुलामीचे चिन्ह मिटविले आहे. पारतंत्र्याच्या काळात लागू करण्यात आलेले अनावश्यक कायदेही हटविण्यात येत आहेत. आयपीसीच्या जागी भारतीय न्याय संहिता आणली जात असल्याचे मोदींनी सांगितले आहे.
राष्ट्रीयतेच्या संचाराचे पर्व
आज आमची एकता सरदार पटेल यांचे स्वप्न पूर्ण करत आहे. ज्याप्रकारे 15 ऑगट हा स्वातंत्र्य दिन अणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे, त्याचप्रकारे 31 ऑक्टोबरचा दिवस राष्ट्रीयतेच्या संचाराचा पर्व ठरला असल्याचे मोदींनी म्हटले आहे. आज भारत चंद्रावर पोहोचला आहे. भारत तेजस लढाऊ विमानापासुन आयएनएस विक्रांत स्वत:च निर्माण करत आहे. आमचे तंत्रज्ञ जगाच्या मातब्बर कंपन्यांचे नेतृत्व करत आहेत. आमचे युवक-युवती देशासाठी पदक जिंकत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
यशाची नवी शिखरं गाठतोय
कोरोना महामारीनंतर सध्या अनेक देशांची आर्थिक स्थिती खराब आहे. काही देश अद्याप महागाईच्या संकटातून बाहेर पडलेले नाहीत. अशा स्थितीत भारत प्रगतीचे ध्वज फडकवत आहे. आम्ही प्रतिकूल स्थितीतही नवनवी शिखरं गाठत आहोत. भारतात गरीबीचे प्रमाण कमी होत आहे. पूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे. जग युद्ध आणि अन्य संकटांना सामोरे जात असताना ही आमच्या सीमा सुरक्षित असल्याचा आम्हाला गर्व आहे. लवकरच आम्ही तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरणार आहोत. आगामी 25 वर्षे भारतासाठी या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण 25 वर्षे असतील. या 25 वर्षांमध्ये आम्हाला समृद्ध होत भारताला विकसित करायचे असल्याचे मोदी म्हणाले.









