सावियो कुतिन्हो यांची टीका : अध्यादेशासाठीचा आवेश सोनसडय़ाच्या बाबतीतही दाखवावा
प्रतिनिधी /मडगाव
मडगावसाठी सर्वांत दुर्दैवी गोष्ट म्हणजे प्रत्येक नेत्याला पालिका स्वतःचा किल्ला म्हणून ओळखला जावा असे वाटत असते. पालिकेवर नियंत्रण ठेवणाऱया नेत्यांमुळे शहराची प्रगती होते की नाही याचे कोणालाही पडून गेलेले नसून ही शहरासाठी आणखी एक वाईट गोष्ट बनली आहे, अशी टीका माजी नगराध्यक्ष आणि शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी केली आहे.
नगराध्यक्ष बदलाचे तियात्र 26 ऑगस्ट रोजी लिंडन पेरेरा यांनी राजीनामा दिल्यापासून दामोदर शिरोडकर यांची 12 ऑक्टोबर रोजी या पदावर निवड होईपर्यंत एकूण 47 दिवस चालले, अशी खिल्ली त्यांनी उडविली आहे. राजकीय नेत्यांनी त्यांचा अहंकार तृप्त करण्यासाठी रातोरात कायदे बदलले. यामुळे गोव्यातील इतर पालिकांना भविष्यात राजकीय जुलूमशाहीचा सामना करावा लागणार आहे, असा इशारा कुतिन्हो यांनी दिला आहे.
23 सप्टेंबरला संमत झालेल्या अविश्वास ठरावानंतर नगराध्यक्ष निवडण्यासाठी 19 दिवस लागले. हे वेगळे सांगण्याची गरज नाही की, निवडणूक प्रक्रियेतील बदलाची सूचना देणारा अध्यादेश निघाल्यानंतरच नवीन नगराध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया घोषित करणारी नोटीस बजावण्यात आली. यातून नगराध्यक्ष निवडणुकीशी संबंधित कलमातील बदलामागचा हेतू स्पष्टपणे सूचित होतो, याकडे कुतिन्हो यांनी लक्ष वेधले आहे.
आमच्या नेत्यांची आणि सरकारची इच्छा असेल, तर ते आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लगेच अध्यादेश काढण्यास तयार असतात. त्याच आवेशाने सरकारने सोनसडा येथील जुन्या कचऱयाच्या ढिगाऱयांवर काही उपाय योजावेत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समन्वय समिती 2009 पासून कार्यरत आहे. तेव्हापासून अनेक मुख्यमंत्र्यांनी समितीच्या बैठका घेतलेल्या आहेत. कोटय़वधी खर्च केले गेले, परंतु सोनसडा समस्या अद्याप सोडविणे शक्य झालेले नाही, याबद्दल कुतिन्हो यांनी खेद व्यक्त केला आहे. सोनसडय़ाचा प्रश्न कधीच त्यांच्या प्राधान्यक्रमावर राहिला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. घरोघरी कचरा संकलन, सोपो वसुली, बीएस-4 इंजिन ट्रक खरेदी यासारखे अनेक प्रश्न पालिकेच्या निर्णयाच्या अभावी प्रलंबित आहेत, याकडे कुतिन्हो यांनी लक्ष वेधले आहे.









