वाहनधारक-ग्रामस्थांचे हाल : रस्ता दुरुस्त करून डांबरीकरण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
अतिवाड-म्हाळेनट्टी शेतातून जाणाऱया तीन किलोमीटरच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कित्येक वेळा तक्रारी देऊन देखील संबंधित ग्राम पंचायत, लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दोन्ही गावच्या ग्रामस्थांना कसरत करतच मार्गस्थ व्हावे लागत आहे.
अतिवाड-म्हाळेनट्टी हा रस्ता सध्या दगड-मातीचा कच्चा आहे. त्यामुळे पावसाळय़ाच्या दिवसात दोन्ही गावच्या ग्रामस्थांना चिखलातून मार्गस्थ व्हावे लागत आहे. दरम्यान अधिक पाऊस झाल्यास रस्ता बंद होतो. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः शेतकऱयांना शेतमालाची ने-आण करणे कठीण झाले आहे.
पावसाळय़ात चिखलाचे साम्राज्य
निवडणूक जवळ आली की लोकप्रतिनिधींकडून रस्ते विकासाच्या आश्वासनाचा पाऊस पडतो. प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागात अनेक गावांना ये-जा करण्यासाठी संपर्क रस्ते नसल्याने ग्रामस्थांना दगड, माती, धूळ आणि पावसाळय़ात चिखलाचा सामना करावा लागत आहे. इतकी बिकट परिस्थिती असली तरी लोकप्रतिनिधींचे रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी वातानुकूलित खोलीत बसून आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष एकदा या मार्गावरून ये-जा करावी, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
या मार्गावर जागृत चाळोबा देवस्थान असल्याने दर्शनासाठी आणि यात्रा करण्यासाठी येणाऱया भाविकांची संख्या अधिक आहे. मात्र रस्ता दगड-मातीचा कच्चा असल्याने भाविकांना ये-जा करणे अवघड झाले आहे. दरम्यान, या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या मागणीसाठी ग्रा. पं. सदस्य मल्लाप्पा पाटील, भरमा व्हरकेरी आणि इतर सदस्यांनी खासदार मंगला अंगडी व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन सादर केले आहे. मात्र अद्यापही रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना धुळीचा आणि चिखलाचा सामना करतच पायपीट करावी लागत आहे.









