धोकादायक झाडांचा प्रश्न कायम : पर्यावरणप्रेमींतून नाराजी, पावसाळ्यात होणार नुकसान
बेळगाव : आरेखन केलेली धोकादायक झाडे अद्याप हटविण्यात आली नाहीत. त्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. वनखात्याने धोकादायक झाडावर आरेखन केले होते. तब्बल 48 झाडांचा सर्व्हे करून त्यावर आरेखन करण्यात आले होते. मात्र, एक वर्षाचा कालावधी उलटला तरी अद्याप आरेखन केलेली झाडे जैसे थेच आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमीतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडे हटविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप या मागणीकडेदेखील दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहरात धोकादायक झाडांची संख्या वाढली आहे. ही झाडे वाहतुकीला आणि स्थानिक नागरिकांना अडथळा ठरू लागली आहेत.
गतवर्षी क्लब रोड येथे झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. तर काही दुचाकींचेदेखील नुकसान झाले होते. दरम्यान, धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी धोकादायक झाडे हटविण्याचे आदेश दिले होते. वनखात्याने धोकादायक झाडांचा सर्व्हे करून त्यावर आरेखन केले होते. शिवाय मनपाकडून ना हरकतदेखील मिळाली होती. मात्र, अद्याप ही झाडे हटविण्यात आली नाहीत. त्यामुळे धोकादायक झाडांचा प्रश्न वर्षानुवर्षे तसाच आहे. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड होऊ लागली आहे. यामध्ये सरकारी व खासगी मालमत्तेचेदेखील मोठे नुकसान होत आहे. घर, इमारती, पत्रे, वीजखांब, वाहने आदींचे नुकसान होत आहे. यासाठी धोकादायक झाडे वेळीच हटविणे गरजेचे असतानादेखील वनखाते मात्र याकडे डोळेझाक करताना दिसत आहे. त्यामुळे शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न कायम आहे.









