गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची टीका
मडगाव : गोवा सरकारने आगीच्या घटनांच्या धोक्यांसंदर्भात वेळोवेळी मिळालेल्या इशाऱयांकडे दुर्लक्ष केल्याची टीका गोवा फॉरवर्डचे प्रमुख आणि फातेर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली असून अग्निशामक दलाच्या तयारीची पातळी वाढवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. राज्यभरात सध्या जंगलात आगी लागण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकारला गेल्या काही वर्षांत अनेक इशारे मिळाले होते, परंतु त्यापैकी एकही गांभीर्याने घेतला गेला नाही. पहिला राज्यनिहाय जोखीम मूल्यांकन, पायाभूत सुविधा व संस्थात्मक मूल्यमापन-2012 हा अहवाल आरएमएसआय महासंचालनालयाने एनडीआरएफ आणि नागरी संरक्षण (अग्निशमन) विभागासाठी तयार केला होता, जिथे त्यांनी फरक दाखवला होता तसेच कर्मचाऱयांची आवश्यकता व्यक्त केली होती. त्यांनी शिफारस केली होती की, प्रत्येक अगिनशामक केंद्राने जोखीम मूल्यांकन अहवाल तयार करावा आणि त्यात कारखान्यांना वा जंगलांना असलेले आगीचे धोके नमूद करावेत, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले. सरदेसाई यांनी सांगितले की, 2019 मध्ये दुसऱयांदा इशारा आला होता. तेव्हा राज्य कृती आराखडा अहवालात स्पष्टपणे इशारा देण्यात आला होता की, गोव्यातील जंगलांत आग लागण्याची शक्यता आहे. बजेटमध्ये यासंदर्भात योजना राबविण्यासाठी 46 कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित होती. परंतु इव्हेंट आयोजनावर कोटय़वधी रुपयांची उधळण करणाऱया या सरकारने लोकाच्या सुरक्षेसाठी एक रुपयाही खर्च केला नाही आणि ती योजना देखील स्वीकारली नाही, असे ते म्हणाले.
तिसरा इशारा आला जेव्हा बर्जर कारखान्याला आगीने वेढले. गोव्यातील तो सर्वांत मोठा कारखाना आणि आतापर्यंतची ती सर्वांत मोठी पर्यावरणीय आपत्ती ठरलेली आहे. राज्यात आगीशी लढण्यासाठी अग्निग्नशामक दल पुरेसे सक्षम नसल्याने त्यांना 70 किलोमीटर अंतरावरील इतरांकडून उपकरणे मागावी लागली, असे सरदेसाई यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या आगीत अनेक हेक्टर काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हताश आणि त्रस्त आहेत. कापणीचा हंगामात आग लागल्याने ते हवालदिल बनले आहेत. अद्याप त्यांना झालेल्या नुकसानासाठी सरकारने कोणतीही भरपाई जाहीर केलेली नाही. आग लागू नये यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही किंवा त्यामुळे प्रभावित झालेल्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न दिसत नाहीत. या गोष्टीकडे पाहिल्यास ही सारी आपत्ती मानवनिर्मित आहे हे स्पष्ट होते, अशी टीका सरदेसाई यांनी केली आहे.









