अंतिम फेरीत टय़ुनिशियाच्या जेबॉरवर मात, राजीव-सॅलिसबरी, पीयर्स-सँडर्सही विजेते
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
महिलांच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱया पोलंडच्या इगा स्वायटेकने मानांकनाला साजेसा खेळ करीत येथे झालेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेतील तिचे हे पहिलेच तर या वर्षातील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. अंतिम फेरीत तिने टय़ुनिशियाच्या पाचव्या मानांकित ऑन्स जेबॉरचा पराभव केला.
गेल्या जूनमध्ये 21 वर्षीय स्वायटेकने प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा दुसऱयांदा जिंकली होती. अंतिम लढतीत तिने जेबॉरचा 6-2, 7-6 (7-5) असा पराभव केला. जेबॉरने सलग दुसऱयांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण स्वायटेकच्या वर्चस्वापुढे तिला जेतेपदाचे स्वप्न साकार करता आले नाही. एकाच मोसमात दोन ग्रँडस्लॅम जिंकणारी स्वायटेक ही सर्वात युवा टेनिसपटू बनली आहे. यापूर्वी 2016 मध्ये जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन व अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता.
येथील लढतीआधी स्वायटेक व जेबॉर यांच्यात गेल्या मेमध्ये इटलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत गाठ पडली होती. त्यावेळीही स्वायटेकने केवळ चार गेम्स गमवित जेतेपद पटकावले होते. येथे स्वायटेकने पहिला सेट सहजतेने घेतला. पण दुसऱया सेटमध्ये जेबॉरने कडवा प्रतिकार केल्याने हा सेट टायब्रेकरपर्यंत लांबला. जेबॉरच्या एका चुकीच्या फोरहँड फटक्यावर स्वायटेकचे जेतेपद निश्चित झाले. दोघींत आतापर्यंत एकूण पाच लढती झाल्या असून जेबॉरने 2 तर स्वायटेकने 3 लढती जिंकल्या आहेत.
जेतेपद मिळविले असले तरी स्वायटेक आपल्या सर्व्हिसवर खुश नव्हती. ‘यापेक्षाही चांगली सर्व्हिस होणे अपेक्षित होते. पण त्याबद्दल आता खेद वाटत नाही, कारण मी शक्य ते सर्व केले होते. चांगल्या सर्व्हिसचा जास्त फायदा झाला असता, इतकेच. जेबॉरचा खेळही दर्जेदार झाला. ती एक कडवी प्रतिस्पर्धी आहे. तिच्याविरुद्ध खेळताना माझ्याकडून काही चुका झाल्या, त्या टाळण्यासाठी मला यापुढे नक्कीच प्रयत्न करावे लागतील,’ असे ती नंतर म्हणाली.
वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान निश्चित
डब्ल्यूटीएकडून दरवर्षी वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दिला जातो. स्वायटेकने येथे जेतेपद पटकावून या पुरस्कारावरील आपला दावाही भक्कम केला आहे. या वर्षातील तिचे हे सातवे जेतेपद असून सलग 37 सामने जिंकण्याचा पराक्रमही तिने यावर्षी केला आहे. या शतकातील ही सर्वात दीर्घ काळ केलेली विजयी घोडदौड आहे. तिचे हे कारकिर्दीतील एकूण दहावे अजिंक्यपद असून 2018 मधील पहिली अंतिम लढत गमविल्यानंतर तिने दहा स्पर्धा सरळ सेट्सनीच जिंकल्या आहेत. जेबॉर येथे पराभूत झाली असली तरी ताज्या मानांकनात तिला पुन्हा दुसरे स्थान मिळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे सँडर्स-पीयर्स मिश्र दुहेरीत अजिंक्य

ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या मानांकित स्टॉर्म सँडर्स व जॉन पीयर्स यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत या जोडीने कर्स्टन फ्लिपकेन्स व एदुआर्द रॉजेर व्हॅसेलिन यांच्यावर मात केली.
सँडर्स-पीयर्स यांनी फ्लिपकेन्स-व्हॅसेलिन यांच्यावर 4-6, 6-4, 10-7 अशी मात करीत जेतेपद पटकावले. 2013 नंतर या स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावणारी ही पहिलीच ऑस्ट्रेलियन जोडी आहे. 2013 मध्ये जार्मिला वुल्फ व मॅट एब्डन यांनी असा पराक्रम केला होता. या सामन्यात सँडर्स-पीयर्स यांनी आक्रमक खेळ केला. पण पहिल्या सेटमध्ये तीन ब्रेकपॉईंट्पैकी एकाचा लाभ घेण्यात त्यांना यश आले नाही. यातून ते सावरले नाहीत आणि फ्लिपकेन्स-व्हॅसेलिन यांनी हा सेट जिंकून आघाडी घेतली. दुसरा सेट सर्व्हिसप्रमाणे पुढे सरकत राहिला आणि शेवटी ऑस्ट्रेलियन जोडीने सामन्यातील पहिला बेक मिळवित 6-4 असा सेट घेत बरोबरी साधली. टायब्रेकरमध्ये दोघांचा तोडीस तोड खेळ झाला. पण अखेरीस सँडर्स-पीयर्स यांनी टायब्रेकर जिंकत जेतेपदही निश्चित केले. सँडर्सला दुहेरी मुकुट साधण्याची संधी होती. पण आदल्या दिवशी तिला महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागल्याने तिची ही संधी हुकली.
पुरुष दुहेरीत राजीव राम-जो सॅलिसबरीने जेतेपद राखले

पुरुषांच्या दुहेरीत अमेरिकेच्या राजीव राम व जो सॅलिसबरी यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅमचे जेतेपद स्वतःकडेच राखण्यात यश मिळविले. या अग्रमानांकित जोडीने अंतिम फेरीत दुसऱया मानांकित वेस्ली कूलहॉफ व नील स्कुपस्की यांच्यावर 7-6 (7-4), 7-5 अशी चुरशीच्या लढतीत मात केली. यावर्षी झालेल्या पेंच व विम्बल्डन स्पर्धेत राजीव व सॅलिसबरी यांनी मॅचपॉई&ंटवरच सामने गमविले होते. पण त्याची पुनरावृत्ती त्यांनी येथे होऊ दिली नाही. 2005 नंतर प्रथमच या स्पर्धेत अग्रमानांकित व द्वितीय मानांकित जोडीत जेतेपदाची लढत झाली. कूलहॉफ व स्कूपस्पी यांनी या वर्षात नऊ स्पर्धांची अंतिम फेरी गाठली, त्यापैकी 6 स्पर्धांत त्यांनी जेतेपद मिळविले. येथे चांगली लढत देऊनही पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचे त्यांचे स्वप्न मात्र भंगले.









