अंतिम लढतीत झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हावर मात : तिसऱ्यांदा पटकावले फ्रेंच ओपनचे जेतेपद
वृत्तसंस्था/ पॅरिस
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या पोलंडच्या इगा स्वायटेकने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवाचा 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करून तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचे अजिंक्यपद मिळवले. याआधी इगाने 2020 व 2022 मध्ये जेतेपद पटकावले आहे. विजयानंतर इगाने कोर्टवर एकच जल्लोष केला. याशिवाय, पुढे येत उपविजेत्या मुचोवाचे अभिनंदन केले.
स्वायटेकने या सामन्यात शानदार सुरुवात केली. तिने पहिला सेट 6-2 असा सहज जिंकला. यानंतर कॅरोलिनाने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत ती अंतिम फेरीत का पोहोचली आहे, हे दाखवून दिले. बिगरमानांकित असूनही तिने नंबर वन खेळाडूसमोर हार मानली नाही आणि दुसरा सेट 7-5 असा जिंकला. यानंतर सामना निर्णायक सेटपर्यंत पोहोचला. यातही कॅरोलिनाने एका क्षणी आघाडी घेतली होती, पण तिला फायनलचे दडपण पेलता आले नाही. स्वायटेकने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत हा सेट 6-4 असा जिंकत विजयाला गवसणी घातली.

स्वायटेकचे चौथे ग्रँडस्लॅम
पोलंडच्या इगा स्वायटेकने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. 2020 आणि 2022 मध्येही ती फ्रेंच ओपन जिंकण्यात यशस्वी ठरली होती. याशिवाय गेल्या वर्षी तिने यूएस ओपन जिंकली होती. आता तिची नजर जुलैमध्ये पहिले विम्बल्डन ओपन जिंकण्यावर असेल.
कॅरोलिना मुचोवा बिगरमानांकित खेळाडू
दुखापतींमुळे झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोवाच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला आहे. स्वायटेक अव्वल मानांकित असताना कॅरोलिना बिगरमानांकित खेळाडू म्हणून या स्पर्धेत सामील झाली होती. असे असूनही कॅरोलिनाने स्पर्धेत शानदार कामगिरी केली. तिने उपांत्य फेरीत बेलारूसच्या आर्याना सबालेन्का हिचा पराभव केला. मात्र, कारकिर्दीतील पहिलेवाहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याचे तिचे स्वप्न भंगले.
चार ग्रँडस्लॅम जिंकणारी युवा टेनिसपटू
22 वर्षीय इगा चार ग्रँडस्लॅम जिंकणारी सेरेना विल्यम्सनंतर पहिली लहान महिला खेळाडू ठरली. सेरेनाने 1999 युएस, 2002 मध्ये फ्रेंच, विम्बल्डन आणि युएस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.
एकीकडे विजेत्या इगाचे कौतुक होत असताना उपविजेत्या मुचोवाच्याही लढतीचे कौतुक करण्यात येत होते. वारंवार झालेल्या दुखापतीमुळे तिला खेळण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली नव्हती; परंतु त्यानंतरही ती कोर्टवर उतरली. अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्याची जिगर दाखवली.









