प्रशासनाला लागली घाई : सत्तांतर होताच पुन्हा सुरू झाल्या हालचाली : विरोधासाठी हवी लोकचळवळीची गरज
कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी :
कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण असा कार्यभार असलेलं कोल्हापुरातील आय.जी. ऑफीस पुण्याला स्थलांतरीत नव्हे तर पुर्नस्थापीत करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे आणि सोलापुरात काही लोकप्रतिनिधींची मागणी असल्याने स्थलांतरापूर्वी जनमताची गरजही नसल्याचे अहवालात म्हटले आहे. कमी गुन्हेगारी, पुणे, सोलापूरकरांची गैरसोय, पुण्यातील प्रशासकीय बैठका, कोल्हापुरातील जुन्या कार्यालयाची जीर्णता, कोल्हापुरात आयुक्त कार्यालय झाल्यानंतर दोन-दोन वरिष्ठांची गरज काय? अशी स्थलांतरास पुरक कारणे देत अहवाल सादर केला आहे. कोल्हापूररची सुज्ञ जनता आणि लोकप्रतिनिधींनी किमान आहे ते इथचं रहावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
कोल्हापुरातील आय.जी. ऑफीस स्थलांतरासाठी पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण जिह्याला गैरसोयीचे, असल्याचे कारण पुढे केले असले तरी वरिष्ठांचे कुटुंबीय पुण्या-मुंबईतच असल्याने कोल्हापूर त्यांना रुचत नसल्याचा अनुभव आहे. 10 डिसेंबरला पुन्हा पत्र पाठवून आय.जी. ऑफीस पुण्याला स्थलांतर नव्हे तर पुर्नस्थापीत करण्यावर भर दिला आहे. कोल्हापुरातील कार्यालय जीर्ण झाले असले तरी पुण्यात नेणार असाल तर तिथलं जुन कार्यालयही चालेल, असाच अहवालाचा रोख आहे. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी गरजेच्या कोल्हापुरातील आयुक्त कार्यालयाचा अद्यापी पत्ताच नाही. कोल्हापूरचे प्रशासकीय महत्व कमी करणारे आय.जी ऑफीस मात्र पुण्याला हलवण्यासाठी विरोध म्हणून कोल्हापूरकरांनीच रस्त्यावर उतरुन विरोध करण्याची गरज आहे.
शहरातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकरण, वाहनांची संख्या, वाढते मतदारसंघ या कारणास्तव पोलीस आयुक्तालय निर्माण करा, असा प्रस्ताव 19 डिसेंबर 2022 ला पोलीस महासंचालकांना व त्यानंतर शासनाकडे प्रलंबित आहे. 20 नोव्हेंबर 1965 ला झालेल्या शासन आदेशाने कोल्हापुरात आय.जी. कार्यालय झाले होते. तो शासन आदेश रद्द करुन पुण्यात स्थलांतर करुन ते पुर्नस्थापित करावे, असे पत्र पोलीस महासंचालक सुनिल फुलारी यांनी पुणे विभागीय आयुक्तांना नुकतेच 10 डिसेंबरला दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांचीही मागणी
पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार राहुल कुल, राम सातपुते, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी कोल्हापूरहून पुण्याला आय.जी. ऑफीस स्थलांतरीत करण्याची मागणी केली होती. सोलापूर आणि पुणे ग्रामीणच्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना चार-पाच तासांचा प्रवास करावा लागतो, असे या लोकप्रतिधींचे म्हणणे होते. चार लोकप्रतिनिधींची मागणी असल्याने स्थलांतराबाबत जनमत घेण्याची गरज नसल्याने अहवालात म्हटले आहे. सांगली-कोल्हापूरच्या नागरिकांचा पुण्याला हेलपाटे होणार नाहीत काय? याबाबत दोन्ही जिह्यातील लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
कोल्हापुरात आय.जी ऑफीस कधी आणि का आले ?
उपलब्ध अभिलेखानुसार तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक, पुणे परिक्षेत्र कार्यालय 1965 पुर्वी पुणे येथे होते. 1965 ला शासन निर्णयाने महाराष्ट्र व कर्नाटक सीमा वादामुळे पुण्यातील हे कार्यालय 1972 च्या दरम्यान कोल्हापुरात आले.
पुण्याला का पाहिजे कार्यालय ?
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण या कार्यालयांर्गत येतात. पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण या दोन जिल्ह्यांच्या वर्षभरातील गुन्ह्यांची संख्या परिक्षेत्रातील एकूण गुन्ह्यांच्या सुमारे 50 टक्के इतकी आहे. कोल्हापूरसह इतर तीन जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या ही 50 टक्के आहे. कोल्हापूर जिह्यात गुह्यांची संख्या सर्वात कमी असून ती नियंत्रणात आहे.
अपर पोलीस महासंचालक, गुन्हे विभाग, राज्य, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, दळणवळण आणि परिवहन विभाग आदी सर्वच प्रमुख शासकीय कार्यालये पुण्यात आहेत. पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथे व्हीव्हीआयपी दौऱ्यानिमित्ताने आय.जी.ंना सातत्याने तिकडे जावे लागते. भविष्यात कोल्हापूर पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये दोन वरिष्ठ पोलीस उपमहानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची कोल्हापूर येथे आवश्यकता नाही. पुण्यातून कोल्हापूरला आय.जी. ऑफीस आणताना जिल्हाधिकाऱ्यांचे संमतीपत्र नव्हते, त्यामुळे आता पुन्हा पुण्याला नेताना जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीची गरज वाटत नाही.
सगळे एस.पी. सकारात्मक
कायदा व सुव्यवस्था, गुन्हेविषयक कामकाज, प्रशासकीय कामकाज व जनतेला वरिष्ठ कार्यालयास गाऱ्हाणे मांडण्याकरिता पुणे सोयीस्कर होईल, असे मत असल्याचे सर्व पोलीस अधीक्षकांनी कळवल्याचे अहवालात म्हटले आहे.
इथली इमारत जुनी, मात्र तिकडे नवी नसली तरी चालेल!
ताराबाई पार्कातील आय.जी. ऑफिसची इमारत 1989 पूर्वी बांधली असल्याने ती जीर्ण झाल्याचा अहवाल पीडब्ल्युडीने दिला आहे. मात्र, पुण्यात हलवले तर नवीन इमारतीची गरज नाही. पुणे ग्रामीणच्या जुन्या कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे आय.जी. ऑफीस तत्काळ सुरू करता येऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे.
कोल्हापूरच्या नावाबाबत प्रश्नचिन्ह
कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण हे पाच जिल्हे मूळ पुणे परिक्षेत्रांतर्गत होते. कोल्हापूर परिक्षेत्र असे नामकरण कुठून झाले, याबाबतचा शासन निर्णय उपलब्ध नसल्याने कार्यालयाचे कोल्हापूर परिक्षेत्र या नावाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.








