ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातून देशाला सर्वाधिक निधी मिळत आहे. त्यामुळे आयएफएससी हे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला हलविणे चुकीचे आणि निरर्थक आहे. तसे झाल्यास मुंबईचे महत्व कमी होईल. तसेच देशाचेही मोठे आर्थिक नुकसान होईल, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयएफएससी सेंटर गुजरातला हलविण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे.
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यापत्रात पवारांनी म्हटले आहे की, आयएफएससी सेंटर गुजरातच्या गांधीनगरला हलविण्याचा निर्णय धक्कादायक आहे. महाराष्ट्रातून देशाला सर्वाधिक कर दिला जातो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. एकटी मुंबई राज्यातील सर्वाधिक कर देते. त्यामुळे हे केंद्र मुंबईत असणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींनी यासंदर्भातील निर्णय रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे मोदींकडे केली आहे.
तसेच पवारांनी या पत्रात रिझर्व्ह बँकेची आकडेवारी सादर देत देशातील कोणत्या राज्यातून देशाला किती कर मिळतो याचाही उल्लेख केला आहे. एकट्या महाराष्ट्राकडून केंद्राला 5 लाख 95 हजार कोटी दिले जातात. त्या तुलनेत गुजरातकडून केवळ 1 लाख 40 हजार कोटी दिले जातात. मग हे केंद्र गुजरातला हलविण्याचा घाट का घातला असा प्रश्न उपस्थित करत पवारांनी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतच ठेवण्यात यावे, असे पत्रात सूचित केले आहे.









