कान्समध्ये चार भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन
पणजी : फ्रान्समधील कान्स येथे उद्या दि. 16 पासून सुरू होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. दि. 16 ते 27 मे या कालावधीत कान्स महोत्सव चालणार आहे. त्यावेळी येत्या नोव्हेंबर महिन्यात गोव्यात होणाऱ्या 54 व्या इफ्फीचे पोस्टर आणि ट्रेलरचे अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तरुणांमधील चित्रपट कलागुणांना जोपासणे आणि त्यासाठी जागतिक चित्रपट बंधुत्वाकडून अधिक सहकार्य मिळवण्याच्या उद्देशाने ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमोरो’ या उपक्रमाची यशोगाथा कान्समध्ये दाखविण्याचे देखील उद्दिष्ट आहे, असेही सांगण्यात आले. दरम्यान, यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुऊगन करणार आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या दिवशी रेड कार्पेटवर ’द एलिफंट व्हिस्परर्स’ या प्रसिद्ध चित्रपटाच्या निर्मात्या गुनीत मोंगा, भारतीय अभिनेत्री तथा मॉडेल आणि 2017च्या मिस वर्ल्ड पुरस्कार विजेत्या मानुषी छिल्लर, भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता आणि प्रसिद्ध मणिपुरी अभिनेता कंगाबम तोंबा असणार आहेत.
कान्समध्ये चार भारतीय चित्रपट
या महोत्सवात चार भारतीय चित्रपटांची अधिकृत निवड झाली आहे. त्यात कनू बहल यांचा ’आग्रा’ चित्रपट असेल. ’डायरेक्टर्स फोर्टनाइट’ विभागात त्याचा ’वर्ल्ड प्रीमियर’ ही होणार आहे. 2014 सालचा पहिला चित्रपट तितली, ’अन सर्टेन रिगार्ड’ विभागात प्रदर्शित करण्यात आला होता. अनुराग कश्यपचा केनेडी, हा चित्रपट मिडनाईट क्रिनिंग्ज आणि नेहेमिच फेस्टिव्हल डी कानच्या ला सिनेफ विभागात दाखवला जात आहे. याशिवाय, मार्चे डू फिल्म्समध्ये अनेक भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या महोत्सवाच्या 76 व्या पर्वात भारताला कंटेंट निर्मितीचे जागतिक केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर व्हिडिओ संदेशाद्वारे उद्घाटन सत्रात विचार मांडणार आहेत.









