पोलीस आयुक्तांचा काळ्या यादीतील गुन्हेगारांना दम
बेळगाव : पोलीस दलाच्या काळ्या यादीतील गुन्हेगारांची परेड घेऊन पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी गुन्हेगारांना दम भरला आहे. शुक्रवारी पोलीस परेड मैदानावर सुमारे 200 हून अधिक जुन्या प्रकरणातील गुन्हेगारांना बोलावून समाजाच्या शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, अशी तंबी देण्यात आली. यावेळी मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., बेळगाव ग्रामीणचे प्रभारी एसीपी जे. रघु आदींसह शहरातील बहुतेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. मार्केट, खडेबाजार, बेळगाव ग्रामीण उपविभागातील काळ्या यादीतील गुन्हेगारांना या परेडसाठी बोलावण्यात आले होते. गेल्या पंधरवड्यातील अप्रिय घटनांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी जातीय दंगलीत धरपकड झालेले, अमलीपदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेले व सोशल मीडिया प्रकरणात सहभागी असलेल्या संशयित आरोपींना बोलावून त्यांना तंबी देण्यात आली आहे. बेकायदा व समाजविरोधी कारवायांमध्ये सहभागी होऊ नये. जर शहराच्या शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केलात तर याद राखा, अशी तंबी पोलीस आयुक्तांनी दिली आहे.









