गोवा कर्मचारी भरती आयोगाचा खुलासा : एलडीसीसाठी 30 जणांनी दिली दोनवेळा परीक्षा
पणजी : एका उमेदवाराने दोनवेळा परीक्षा दिल्यास पहिल्या परीक्षेचेच गुण ग्राह्य धरण्यात येणार असल्याचा खुलासा गोवा कर्मचारी भरती आयोगातर्फे करण्यात आला आहे. आयोगातर्फे नोटिस जारी करुन ही माहिती दिली आहे. अलिकडेच एलडीसी पदाच्या परीक्षेसाठी एकूण 30 उमेदवारांनी दोनवेळा परीक्षा दिली होती. त्यामुळे आयोगाने हा खुलासा केला आहे. एलडीसी पदासाठी दोन्ही सीबीटी परीक्षा पार पडल्या असून त्याचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. काही उमेदवार विविध पदांसाठी स्वतंत्र वेगवेगळे अर्ज करतात. त्यांना हॉल तिकीट वेगळे मिळते आणि ते एकच परीक्षा दोनवेळा देतात.
अशा परिस्थितीत प्रथम जी परीक्षा होईल तिचे गुण विचारात घेतले जाणार असल्याचे भरती आयोगाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी दोन परीक्षांना बसू नये आणि दोनदा अर्जही सादर करु नये. काही पदांकरीता अर्ज भरले आणि दोन वेगवेगळी हॉल तिकीट मिळाली तरी दोन्ही परीक्षा देण्याची गरज नाही. एक परीक्षा दिली तरी चालेल, असे आयोगाने खुलाशात म्हटले आहे. काही उमेदवार विनाकारण विविध पदांसाठी अर्ज भरतात. त्यामुळे उमेदवार वाढतात. त्यांची संख्या वाढली की परीक्षा विविध ठिकाणी घ्यावी लागते. त्यामुळे परीक्षेचे दिवस वाढतात. अलिकडे झालेल्या परीक्षेतून एकच उमेदवार दोनवेळा परीक्षा देत असल्याचे समोर आल्यामुळे आयोगाने वरील स्पष्टीकरण जारी केले आहे.









