खेड :
केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी विधान परिषदेत दिशाभूल करून बेछूट आरोप करणाऱ्या आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घेऊन दाखवाच, असे खुले आव्हान शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिले आहे. खोटे आरोप करून दिशाभूल करणाऱ्या अनिल परब यांच्यावर येत्या 2 दिवसातच हक्कभंग आणणार असल्याची माहितीही मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
ते म्हणाले, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा काडीमात्र संबंध नसतानाही अनिल परबांच्या बिनबुडाच्या आरोपांना अजिबात भीक घालत नाही, असे ठणकावत ठोस पुरावे असतील तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटावे, असा टोलाही लगावला. विधीमंडळात 35 वर्षे काम केले असून प्रत्येक नियमांची माहिती आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप करताना 35ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. तसे न करता गृहराज्यमंत्री योगेश कदम विधान परिषद सभागृहात नसताना आरोप केले आहे. डान्स बार सुरू कऊन लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे पाप न करता संसार उभे करण्याचे काम केले आहे. जिवंत असेपर्यंत मी आणि माझे कुटुंबीय कुठल्याही प्रकारचा डाग लावून घेणार नाही, असे ठणकावत आम्ही डान्स बार चालवणारे नसून डान्स बार फोडणारे आहोत, असा टोलाही लगावला. राज्यातील सर्व डान्स बार बंद करण्याबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना सूचित केल्याचेही स्पष्ट केले.








