भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या चिंताजनक : सर्व शासकीय इस्पितळांमध्ये इंजेक्शन उपलब्ध : दुर्लक्ष बेतू शकते जीवावर
बेळगाव : शहरासह जिल्ह्यातील श्वानदंशांच्या वाढत्या घटना चिंताजनक बनल्या आहेत. दरवर्षी हा आकडा वाढत चालला असून जखमी व मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. जानेवारी ते डिसेंबर 2024 पर्यंत वर्षभरात 21 हजार 324 जणांना श्वानदंश झाला आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असल्याने या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यासह संबंधितांनी वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणे गरजेचे आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव शहर आणि उपनगरांसह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते. मात्र, संबंधित ठेकेदाराचा ठेका संपला आहे. नवीन ठेकेदाराच्या नियुक्तीसाठी निविदा काढूनही महापालिकेला ठेकेदार मिळणे कठीण झाले आहे. जुन्या ठेकेदाराकडूनच सध्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात आहे. दरवर्षी भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांचा चावा घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादी घटना घडल्यानंतरच काही दिवस कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झालेली पाहावयास मिळत आहे. आरोग्य खात्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल 21 हजार 324 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. जखमी झालेल्या दोघांवर मृत्यू ओढवल्याने ही बाब चिंताजनक बनली आहे.
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तातडीने त्यावर उपचार घेणे गरजेचे आहे. मात्र, अद्यापही ग्रामीण भागात बहुतांश जण गावठी औषधोपचार घेत आहेत. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन अँटीरॅबिज इंजेक्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे. अँटीरॅबिजचे इंजेक्शन घेतल्यानंतरच रॅबिज रोखता येऊ शकतो. रॅबिजची लागण झाल्यास त्यावर उपचार नसल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रॅबिजबाबत जनजागृती करण्यासह नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे.
रॅबिजवर नियंत्रण मिळविण्यासाठी पशुसंगोपन खात्यानेही पुढाकार घेतला आहे. दरवर्षी पाळीव कुत्र्यांना मोफत अँटीरॅबिज इंजेक्शन दिले जात आहे. मात्र, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अद्यापही कायम आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यास सर्वप्रथम जखम साबणाने आणि स्वच्छ पाण्याने धुतली पाहिजे. जखमेवर प्रतिजैविक मलम लावण्यासह पट्टीने जखम झाकली पाहिजे. कुत्र्याने चावलेल्या दिवशी व त्यानंतर तिसऱ्या दिवशी, सातव्या दिवशी, चौदाव्या दिवशी व 21 व्या दिवशी अशी पाच अँटीरॅबिज इंजेक्शन्स दिली जातात. जिल्ह्यातील वाढत्या श्वानदंशांच्या घटना पाहता प्रशासनाने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कुत्र्यांचा बंदोबस्त व निर्बिजीकरणाची मोहीम तीव्र करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कुत्रा चावल्यानंतर काय करावे?
कुत्र्याने चावा घेतलेल्या ठिकाणी साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवावे, जेणेकरून आतमध्ये कोणताही विषाणू जाणार नाही. जखमेवर हळद लावू नये. तातडीने रुग्णालयात दाखल होऊन लस घ्यावी. पिसाळलेला कुत्रा चावला किंवा साधारण कुत्रा चावला तरी त्याकडे दुर्लक्ष न करता लस टोचून घ्यावी. कुत्रा साधारण असला तरी तो रेबिजग्रस्त असू शकतो. किंवा काही दिवसांनी त्याच्यामध्ये लक्षणे दिसू शकतात. म्हणून कोणताही धोका न पत्करता लस घ्यावी. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उपचार करण्यास हयगय नको
श्वानदंश झाल्यानंतर संबंधितांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तातडीने औषधोपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयासह सर्व तालुका रुग्णालयांमध्ये श्वानदंशावरील औषधांचा साठा उपलब्ध आहे. उपचार करण्यास हयगय न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अन्यथा मृत्यू ओढवू शकतो.
– डॉ. संजय दोडमनी, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी









