आपल्या देशात ‘लग्न’ हा एक संवेदनशील मुद्दा आहे. एखाद्या तरुणाचे किंवा तरुणीचे लग्न बराच काळ लांबले, तर समाजात तो चर्चेचा विषय बनतो. विशेषतः छोटय़ा शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागात अशी वृत्ती अधिक प्रमाणात दिसून येते. याच विवाहाच्या अनुषंगाने आपल्या देशात बऱयाच अजब परंपरा पहावयास मिळतात. आपला देश पारंपरिक विचारसरणीचा देश मानला जातो. त्यामुळे येथे असे घडले तर त्याचे फारसे आश्चर्य वाटत नाही. तथापि, जेव्हा एखाद्या विकसीत आणि 100 टक्के साक्षर देशात विवाहासंबंधात लोक जर इतके संवेदनशील असतील तर आपल्याला कमालीचे आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही.
डेन्मार्क या देशात कोणीही युवक किंवा युवती 25 व्या वर्षापर्यंतही अविवाहित असेल तर त्याला विवाहासाठी तयार करण्यासाठी, किंवा आतापर्यंत याने विवाह केला नाही म्हणून चक्क रस्त्यात बसवले जाते आणि त्याला दालचिनी पावडरने आंघोळ घातली जाते. 25 वर्षांचा घोडा किंवा घोडी होऊनही विवाह न करण्यासाठी त्याला समाजाने केलेली ही शिक्षा असते. अर्थात, या शिक्षेला घाबरुन युवक-युवती वय वर्षे 25 च्या आत विवाह करतातच असे नाही. कित्येकाना विवाह करण्यापेक्षा ही दालचिनीच्या पावडरीने आंघोळ घालण्याची शिक्षा अधिक सुसहय़ वाटते. त्यामुळे या शिक्षेचा तसा फारसा व्यवहारी उपयोग नाही. मात्र, एक विस्मयकारक परंपरा म्हणून या शिक्षेची चर्चा मात्र जगभरात निश्चित होते.
डेन्मार्कची ही परंपरा खूपच जुनी आहे, असे सांगितले जाते. साधारणतः 1 हजार वर्षांपूर्वी मसाल्याचे पदार्थ विकणारे लोक युरोपात या शहरातून त्या शहराकडे विक्रीसाठी हालचाल करीत असत. अशा तरुण व्यापाऱयांचे लग्न त्यांच्या भटक्या व्यवसायामुळे लवकर होत नसे. अशा युवकांना ‘पीपरडय़ूज’ तर युवतींना ‘पीपरमँडेस’ अशी संज्ञा होती. अशांना मसाल्याच्या पावडरीने अंघोळ घालण्याची प्रथा सुरु झाली. आज परिस्थितीत परिवर्तन झाले असतानही ती सुरु आहे.