वाहनांची वेगमर्यादा कमी होऊन ती केवळ ताशी साठ किलोमीटरपर्यंत असावी असा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. देवभूमीकडून ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’, ‘फेस्टिव्हल डेस्टिनेशन’, असा प्रवास करत ‘क्राईम डेस्टिनेशन’, ‘ड्रग्ज डेस्टिनेशन’, पर्यंत पोहोचलेला गोवा ‘अॅक्सिडंट डेस्टिनेशन’ होऊ नये, यासाठी सर्वांनाच गांभीर्याने विचार करुन, आपापाल्या जबाबदाऱ्या नीट सांभाळाव्या लागतील.
विकासाबरोबर एक समस्या सुटताना दुसऱ्या बाजूने नवी समस्या तयार होत असते आणि हा विकास अधिक गतिमान झाला, तर नव्या समस्याही झपाट्याने उत्पन्न होतात आणि विक्राळ, भयानक, भीषण, उग्र रुप धारण करतात. गोव्याचा विकास एवढा झालेला आहे की त्यामुळे बहुतेकांच्या हाती पुरेसा नव्हे, भरपूर पैसा आला आहे. पैशांमुळे अनेकांमध्ये उन्माद मातला आहे. उन्मादामुळे दुसऱ्याची सोडाच, स्वत:च्याही जीवाची पर्वा राहिलेली नाही. उन्मादाच्या वाऱ्यावर स्वार झाल्यानंतर स्वत:च्या जीवाची, स्वत:च्या जगण्याची काळजी राहत नाही. खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे बेपर्वाई, बेशिस्तपणा, बेजबाबदारपणा, बेकायदेशीरपणा वाढतो. हे सारे प्रकार स्वत:च्या घरातही घडतात आणि सार्वजनिक जागेवरही घडतात! सर्वच क्षेत्रात ते घडत असतात. उपरोल्लेखित सर्व प्रकार जेव्हा मार्गांवर घडू लागतात तेव्हा त्यांचा परिणाम व्हायचा तोच होतो.
सरकारचा दोष काय?
काढली जीभ, लावली ताळ्याला आणि दिला दोष सरकारला. त्यातून वाहतूक पोलिसांची सुटका नाहीच. असे हे किती काळ चालवायचे? रस्ता अपघातांसाठी केवळ सरकारलाच का जबाबदार धरायचे? माता, पिता, शिक्षक, मित्र, नातेवाईकही तेवढेच जबाबदार नाहीत काय? वाहन चालविण्यास शिकविणारी ‘ड्रायव्हिंग स्कूल्स’ आहेत, त्यांची भूमिका व कार्य पडताळून पहावे लागेल. ज्या मोटर वाहन कायद्याद्वारे एखादा युवक-युवती वाहनचालनाचा परवाना मिळवितो तो कायदा त्याला ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकविला जातोय काय? ज्या गतीने वाहने चालविण्यास रस्त्यांवर परवानगीच नाही, ती गती वाहनांमध्ये असावीच तरी कशाला? ज्या पोलिसांना हेल्मेट नसलेला दुचाकीचालक दिसतो त्यांना बेदरकारपणे, गोंगाट करत जाणारी वाहनेही दिसायलाच हवीत. दारु पिऊन वाहने चालविल्यानेही अपघात होतात, तसेच अंमलीपदार्थ सेवन केल्यानेही अपघात घडतात, एवढेच नव्हे तर अलीकडील पर्यटकांमुळे घडलेले बहुतेक अपघात ‘बूम’ मुळे होतात अशी चर्चा आहे. अन्य अनेक कारणे अपघातांना कारणीभूत असू शकतात. प्रथमदर्शनी पाहता बेदरकारपणे वाहन चालवितो आपण, खबरदारी न घेता वाहन चालवितो आपण, हेल्मेट वापरत नाही आपण, सीट बेल्ट वापरत नाही आपण, मोटर वाहन कायदा शिकत नाही आपण, मद्यप्राशन-ड्रग्ज सेवन करुन वाहन चालवितो आपण आणि अपघातही घडवितो आपणच! मग यात सरकारचा काय दोष?
पोलिसांच्या पाच हजार सूचना
अलीकडच्या काळात अपघातांवर नियंत्रण यावे म्हणून सरकार काही प्रयत्न करत असल्याचे दिसते. पोलीस व वाहतूक खात्याबरोबर अन्य काही खात्यांनी एकत्रितपणे जे प्रयत्न चालविले आहेत, त्याकडे डोळेझाक करता येणार नाही. तीन महिन्यांपूर्वी पणजीत अपघातांविषयी जनसुनावणी झाली. जनतेच्या आणि पोलिसांच्याही सूचनांवर विचारविनिमय झाला. पोलिस खात्याने सरकारला आतापर्यंत तब्बल पाच हजार सूचना केल्या असून त्यापैकी केवळ 20 सूचनांची अंमलबजावणी झालेली आहे. कर्ता पुरुष, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, मित्र, नातेवाईक किंवा समाजप्रिय माणसे अपघातात मृत्यूमुखी पडावी, असे कुणालाही वाटत नसते. अपघाताच्या दोन्ही बाजूने जनताच जबाबदार असते. काहीवेळा सरकारही जबाबदार असते. पूर्वी रस्त्यांवरील वळणे, उतरण, वाहनांचे ‘ब्रेक फेल’ होणे, टायर फुटणे अशांमुळे अपघात घडायचे. आता सर्व वाहने सुस्थितीत असतात, रस्तेही बहुतेक गुळगुळीत असतात. त्यामुळे पूर्वीची कारणे आता सर्रास दिसत नाहीत. सर्व कारणांचा सम्यक दृष्टीने विचार केल्यानंतर शेवटी बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळेच सर्वाधिक अपघात घडतात, हाच निष्कर्ष निघतो.
अपघात नको, तर एवढी गती कशासाठी?
ताशी 60 किलोमीटरपर्यंतच गतीने वाहन चालविण्यास परवानगी असते. त्याच्यापुढच्या गतीचे फलक सहसा कुठल्या मार्गावर दिसत नाहीत. हीच गती सुरक्षित वाटते, पण तीही कुठल्या रस्त्यावर हे वाहनचालकाने ध्यानात ठेवायला हवेच. तर मग 120 पासून 190 पर्यंत आणि पुढे 300 पर्यंत गतीच्या वाहनांची निर्मिती का केली जाते? ही वाहने चालवायची कुठे? रस्त्यांवर की हवेत? चौपदरी, सहापदरी महामार्गांवर तरी सुरक्षित आहेत काय ही वाहने? तेथेही भीषण अपघात घडतातच. इथे सरकारची भूमिका महत्त्वाची ठरते. वाहननिर्मिती करताना वाहनात वेगमर्यादा (स्पीड) घालण्याची गरज असून सरकार हा निर्णय घेत नाही, ही गोवा, भारत सरकारची चूक आहे. दुचाकीचालक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये न जाता केवळ पाचच नियम तोंडपाठ करतो, अन्य अनेक महत्त्वपूर्ण नियम त्याला कळायला पाहिजेत ते कळतच नाही. वैयक्तिक आणि सार्वजनिक शिस्तीचे संस्कारही झालेले नसतात. त्यात भर म्हणून आईबाबांच्या हाती नोटा करकरत असतात आणि बँकेत ‘बॅलन्स’ वाढलेला असतो. पैशांच्या जोरावर बेकायदेशीरपणा बळावतो. माणसांना, कायद्याला न जुमानण्याची वृत्ती बळावते. त्यातून मनात माजलेला बेदरकारपणा वाहनाच्या गतीत उतरतो आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते होते!
वाहतूक कायद्याशी प्रामाणिकपणा
ड्रायव्हिंग स्कूल्समध्ये वाहन चालविण्यास शिकविण्याबरोबर मोटर वाहन कायदाही काटेकोरपणे शिकवायला हवा. त्याचीही लेखी, तोंडी परीक्षा घेऊन निकाल द्यायला हवा. प्रत्येक क्षेत्रात कार्यरत होण्यापूर्वी आपल्या पेशाबाबत शपथ घेतली जाते, तशीच शपथ वाहनचालकाकडून घेऊन नंतरच त्याला परवाना द्यायला हवा. त्यानंतर त्याने वाहतूक कायद्याशी प्रामाणिक रहायला हवे. देवभूमीकडून ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’, ‘फेस्टिव्हल डेस्टिनेशन’, असा प्रवास करत ‘क्राईम डेस्टिनेशन’, ‘ड्रग्ज डेस्टिनेशन’, पर्यंत पोहोचलेला गोवा ‘अॅक्सिडंट डेस्टिनेशन’ होऊ नये, यासाठी सर्वांनाच गांभीर्याने विचार करुन, आपापाल्या जबाबदाऱ्या नीट सांभाळाव्या लागतील.
राजू भिकारो नाईक








