भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले करुन भारताच्या अधिकाराचे पालन केले आहे. दहशतवाद्यांनी आमच्या निरपराध नागरीकांच्या हत्या केल्या होत्या. त्यांचा प्रतिशोध घेणे हा आंतरराष्ट्रीय प्रथांच्या अनुसार आमचा अधिकारच होता. आम्ही त्याचेच पालन सर्व नियमांना अनुसरुन केले आहे. भारताने केलेल्या आपल्या अधिकाराच्या पालनाच्या विरोधात पाकिस्तानने पुन्हा भारताला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. मग आम्ही पाकिस्तानला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी तीव्र टिप्पणी भारताच्या परराष्ट्र विभागाचे मुख्य सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. भारताच्या पाकिस्तानवरील हल्ल्याचे ठाम समर्थन त्यांनी या पत्रकार परिषदेत केले. या परिषदेचे आयोजन हल्ल्यानंतर काही वेळाने करण्यात आले होते. पाकिस्तानानील दहशतवादी आस्थापने मोडून काढणे हे आमचे कर्तव्यच होते. आमच्या देशाची सुरक्षा आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. या संबंधी आम्ही कोणतीही तडजोड करु शकत नाही. आमच्या अधिकारांचेच आम्ही पालन केले असून यापुढेही आवश्यकता भासल्यास आम्ही कठोर कृती करण्यास मागेपुढे पहाणार नाही. आमच्या देशाचा अवमान आम्ही कधीही सहन करणार नाही, असा आमचा निर्धार आहे, अशा अर्थाचे वक्तव्य विक्रम मिस्त्री यांनी केले. त्यांनी पत्रकार परिषदेत भारताच्या प्रतिशोधात्मक प्रत्युत्तराची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.










