कागदपत्रे योग्य असली तरच टोलगेट ओपन होणार, अन्यथा वाहनांचा परतीचा प्रवास
वार्ताहर/रामनगर
यापुढे आता कर्नाटकातून गोवा राज्यात जाणार असाल तर आपल्या वाहनांची कागदपत्रे योग्य असल्यासच गोवा राज्यात जायला मिळणार आहे. गोवा राज्यात देश-विदेशातून पर्यटक जात असतात. तर गोवा राज्यात पर्यटकांना गेल्यावर अनेक ठिकाणी पर्यटकांच्या वाहनांना अडवून कागदपत्रांची तपासणी करण्यात येते तर तपासणीवेळी काही पर्यटकांची लूट होत असल्याने आता गोवा सरकारने गोवा राज्यात प्रवेश करतेवेळी टोलनाके उभे केले आहेत. या टोलनाक्यावर प्रत्येक वाहनाचे कागदपत्रे योग्य असली तरच येथील टोल गेट ओपन होतो. अन्यथा कागदपत्रे नसलेल्या वाहनांना परतीचा प्रवास करावा लागणार आहे. खास करून अनमोड घाटातून गोवा राज्यात जाताना वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे तपासणे गरजेचे बनणार आहे.
गोव्या राज्यात कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आदी भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी आपली वाहने घेऊन जात येत असतात. तर यापूर्वी आलेल्या पर्यटकांची वाहने गोवा राज्यात ठिकठिकाणी अडवून वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती. तर यावेळी बऱ्याच पर्यटकांची कागदपत्रांची पाहणी करताना लूट होत असल्याची तक्रार वाढत चालल्याने आता गोवा सरकारने गोवा राज्यात प्रवेश करतेवेळी आलेल्या प्रत्येक वाहनाला एकाच ठिकाणी कागदपत्रे तपासणी करण्यासाठी टोल उभारण्यात आले आहेत. सदर टोलवर वाहनाच्या नंबरप्लेटवरून गाडीची सर्व कागदपत्रे योग्य आहेत काय? याची तपासणी केली जाते. व एखाद्या वाहनांची कागदपत्रे योग्य नसल्यास या ठिकाणी बनवण्यात आलेले टोल गेटच उघडत नाही.









