पाकिस्तानी लष्करप्रमुखांची अमेरिकेच्या भूमीतून अणुयुद्धाची धमकी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी ‘…जर भविष्यात भारतासोबतच्या युद्धात आमच्या देशाचे अस्तित्व धोक्यात आले तर ते संपूर्ण प्रदेश अणुयुद्धात टाकतील’ अशी धमकी दिली आहे. ‘आम्ही अणुशक्तीसंपन्न राष्ट्र आहोत आणि जर आम्हाला असे वाटत असेल की आम्ही बुडत आहोत, तर आम्ही अर्धे जग आपल्यासोबत घेऊन जाऊ, असे वक्तव्य मुनीर यांनी केल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. असिम मुनीर यांची ही टिप्पणी खूपच खळबळजनक आणि असाधारण आहे. अमेरिकेच्या भूमीवरून तिसऱ्या देशाला अणुयुद्धाची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
असिम मुनीर यांनी फ्लोरिडातील टाम्पा येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये पाकिस्तानी वंशाचे उद्योजक अदनान असद यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये ही धमकी दिली. याप्रसंगी पाकिस्तानी डायस्पोराचे सुमारे 120 सदस्य उपस्थित होते. फील्ड मार्शल असिम मुनीर यांनी अणु धमकीसोबतच सिंधू जलवाटप करारावरही भाष्य केले अगाश. भारताने हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने 25 कोटी लोकांना उपासमारीचा धोका निर्माण होऊ शकतो. आम्ही भारताने धरण बांधण्याची वाट पाहू आणि जेव्हा ते बांधेल तेव्हा आम्ही ते क्षेपणास्त्र हल्ल्यात नष्ट करू, असेही ते म्हणाले. सिंधू नदी ही भारतीयांची कुटुंबाची मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, असा इशाराही असिम मुनीर यांनी कार्यक्रमात दिला.
फ्लोरिडा येथील समारंभाची सुरुवात कुराणातील आयतांचे पठण आणि पाकिस्तानच्या राष्ट्रगीताने झाली. याप्रसंगी पाहुण्यांना मोबाईल फोन आणि डिजिटल उपकरणे बाळगण्याची परवानगी नव्हती. तसेच भाषणाचा कोणताही लेखी दस्तऐवज जारी करण्यात आला नाही.









