भाजप अन् संजदची वाढविली धाकधुक
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार निवडणुकीसंबंधी रालोआचे सहकारी, केंद्रीय मंत्री आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. आघाडी अंतर्गत राज्यात 15 जागा न मिळाल्यास आमचा पक्ष स्वबळावर 100 जागांवर निवडणूक लढविणार आहे. बिहराच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आमच्या पक्षाचे 10-15 हजार मतदार आहेत, अशास्थितीत आमच्या पक्षाला 15 जागा मिळाव्यात असे मांझी यांनी म्हटले आहे.
यावेळी आमच्या पक्षाचे लक्ष्य कुठल्याही स्थितीत मान्यताप्राप्त पक्ष होण्याचे आहे. याकरता पक्षाला कमीतकमी 8 जागांवर विजय मिळणे आणि एकूण मतांचे प्रमाण 6 टक्के असणे आवश्यक आहे. आमच्या पक्षाला 15 जागा देण्यात आल्या तरच हे शक्य आहे. पक्षाची स्थापना होऊन 10 वर्षे झाली असून आतापर्यंत मान्यताप्राप्त पक्ष न होणे आमच्यासाठी अपमानास्पद आहे असे मांझी यांनी बोधगया येथे बोलताना म्हटले आहे.
मांझी यांच्या या मोठ्या मागणीनंतर रालोआतील महत्त्वाचे पक्ष भाजप आणि संजदवरील दबाव वाढला आहे. जागावाटपापूर्वी मांझी यांनी स्वत:चा आक्रमकपणा दाखवून दिला आहे. यापूर्वी त्यांनी स्वत:च्या पक्षाला 20-40 जागा मिळाव्यात असा दावा केला होता. तर आता 15 जागांच्या मागणीवर ठाम दिसून येत आहेत. रालोआत भाजप, संजद, चिराग पासवान यांचा लोजप-आर, जीतनराम मांझी यांचा हम आणि उपेंद्र कुशवाह यांचा आरएलम पक्ष सामील आहे.









