शिराळा / प्रितम निकम :
शिराळा तालुका हा डोंगरी तालुका मानला जातो. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा याच तालुक्यात पडतो. परंतु यावर्षी तापमानात कमालीची वाढ झाली असल्याने मार्च अखेरपर्यंतच तालुक्यातील ४९ तलावापैकी १२ तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. प्रशासकीय अधिकारी व शेतकरी यांनी योग्य नियोजन न केल्यास तालुक्यातील लोकांना पुढील काळात शेतीसाठीच काय तर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार यात शंका नाही. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा शिराळा तालुक्यात पडतो मगं शिराळा तालुक्याची अवस्था ही असेल तर बाकी तालुक्यांची अवस्था काय होणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गतवर्षी एप्रिल, मे महिन्यात साधारणतः सरासरी ३५ ते ३८ डिग्री तापमानाची नोंद झालेली दिसून येत होती. परंतु यावर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्येच ही स्थिती शिराळा तालुक्यात अनुभवायला मिळत आहे. याबाबत शिराळा येथील जलसंधारण अधिकारी प्रविण तेली यांच्याशी संपर्क साधला असता पावसाचा विचार करता गेल्या ३ ते ४ वर्षाच्या तुलनेत गतवर्षी अनेकदा अतिवृष्टी तसेच सरासरीपेक्षा तिप्पट पर्जन्यमान झाले. तरीदेखील मागील वर्षी अलनिनो प्रमाणेच इतर वादळाचा परिणाम तसेच ग्लोबल वार्मिंगचा स्पष्टपणे परिणाम वातावरणामधील तापमान वाढीस तसेच हवेतील बदलास कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले.
सध्या हवामानामध्ये अचानक तापमानात झालेल्या वाढीमुळे तीव्र व मोठ्या प्रमाणात जलाशयातील पाणी साठ्याची बाष्पीभवन प्रक्रिया वेगाने होत आहे. तसेच तालुक्यातील तलावामधील पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. याच्या परिणामामुळे पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर यावर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंबहुना मे महिन्याच्या पूर्वाधातच शिराळा तालुक्यातील सर्व पाझर तलाव कोरडे पडण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे ज्या तलावाच्या बुडीत क्षेत्रात तसेच खालील बाजूस पाणीपुरवठा योजनेच्या उद्भव विहिरी, विंधन विहिरी आहेत अशा उद्भवाच्या स्रोतास पाणी कमी पडण्याची दाट शक्यता आहे. जनावरांना व लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
- जलसंधारण अधिकारी प्रविण तेली यांनी केले शेतकऱ्यांना आवाहन
प्रविण तेली यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, सर्व तलावांच्या बुडीत व संपादित क्षेत्र परिसरातील तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत तलावामध्ये थेट पंपिंग मशीनरी टाकून अथवा इंजिनद्वारे पाणी उपसा करू नये, असे आढळून आल्यास संबंधितांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल. शेतकरी बांधवानी प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे. जेणेकरून माहे मे अखेर किंबहुना मान्सून पूर्व पाऊस होईपर्यंत तरी तलावातील पाणीसाठा टिकून राहिल. त्याचा अप्रत्यक्ष सिंचनांद्वारे निश्चितपणे शेतकऱ्यांना लाभ होईल.
- शिराळा तालुक्यात मार्च अखेरपर्यंत ४९ पैकी कोरडे ठणठणीत पडलेले १२ तलाव
हातेगांव (अंबाबाई वाडी), शिरसी (गिरजवडे रोड), शिरसी (काळे खिंड), शिरसी (कासारदरा), पाचुंब्री, करमाळे नंबर शिवारवाडी, भैरववाडी, निगडी जुना (कासारदरा), निगडी (खोकड दरा), इंग्गुळ, सावंतवाडी, दाहकता वाढल्याने सद्यस्थितीत ४९ पैकी १२ तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत.
- कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना
यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून शिराळा तालुक्याच्या उत्तर व पूर्व भागातील जास्तीत जास्त सर्व पाझर तलाव हे प्रति वर्षी वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेद्वारे पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याने व उन्हाळ्यात आवर्तनाने भरून घेणे सोईस्कर होणार आहे. यामुळे तलावातील पाणीसाठ्याची पातळी टिकून राहील व सिंचन विहिरी तसेच विंधन विहिरीच्या भुजल पातळी वाढीस मदत होईल. याचा अप्रत्यक्ष सिंचनांद्वारे शेतकऱ्यांना लाभ होईल. सद्यस्थितीत शिराळा तालुक्यातील करमाळे नंबर १ व पाचुंब्री येथील पाझर तलावाचे साठवण तलावामध्ये रूपांतर करण्याचे व दुरुस्तीचे काम मृद व जलसंधारण विभाग, स्थानिक स्तर यांचेमार्फत सुरु असून सध्या ते प्रगतीपथावर आहे. त्यामुळे सदर दोन्हीही पाझर तलावामधील पाणीसाठा हा मृत संचय पातळीच्या खाली गेल्याने सदरचे दोन्हीही पाझर तलाव कोरडे पडले आहेत.








