ऑनलाईन टीम / तरुण भारत :
2024 ला महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा प्लॅन तयार आहे, असे सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. पटोलेंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मागील आठवडय़ात अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आमची महाआघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छाही आहे. पण इच्छा असणं पुरेसं नसतं. 2024 महाविकास आघाडी होईल की नाही, हे आत्ताच कसं सांगू असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे 2024 मध्ये शरद पवारांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. या घडामोडींबाबत नाना पटोले यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी यावर आपली भूमिका मांडली.
विरोधी पक्षांना सोबत घेऊन भाजपविरोधात चालण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच दिशेने आम्ही जात आहोत, पण 2024 ला महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा प्लॅन तयार आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.








