केवायसी करण्याकडे ग्राहकांचे दुर्लक्ष : केवायसीचे काम रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना अडचणी
प्रतिनिधी/ बेळगाव
गॅस ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक करून देखील काही ग्राहकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. केवायसीचे काम रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. गॅस ई-केवायसी नसल्यास गॅस कनेक्शन आणि गॅस सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांनी जागृत होऊन तातडीने गॅसची ई-केवासयी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
गॅस डाटा एकत्रित करण्यासाठी ई-केवायसीचे काम सुरू आहे. सुरुवातीच्या काळात हे काम गॅस कंपन्यांकडे होते. दरम्यान गॅस कंपन्यांसमोर केवायसीसाठी रांगा लागल्या. त्यानंतर केवायसीची जबाबदारी गॅस वितरकांकडे सोपविण्यात आली. गॅस वितरक घरोघरी जावून केवायसी करीत आहेत. मात्र ग्राहक घरात नसणे आणि सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे हे कामही संथगतीने सुरू आहे. शासनाने आता गॅस ई-केवायसीची सुविधा मोबाईलवर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वितरकांवरील ताण काहीसा कमी झाला आहे. मात्र काही ग्राहकांकडून याकडे पाठ फिरवली जात आहे. त्यामुळे आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे हे काम पूर्ण झाले नाही.
सर्व गॅसधारकांना केवायसी बंधनकारक आहे. केवायसी नसल्यास उज्ज्वला योजनेंतर्गत मिळणारी सबसिडी बंद होणार आहे. त्यामुळे गॅस ग्राहकांना केवायसी करावी लागणार आहे. ग्राहकांनी आधारकार्ड, गॅस पासबुक, अंगठ्याचा ठसा देऊन ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन गॅस कंपन्यांनी केले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी मोबाईल अॅपवरून घरबसल्या केवायसी करावी, असेही सांगण्यात येत आहे. गॅस कनेक्शनला बायोमेट्रिक ई-केवायसीचे प्रमाणीकरण अनिवार्य आहे. गॅस केवायसीमुळे एकूण गॅस ग्राहकांची संख्या आणि वापरात येणाऱ्या ग्राहकांची संख्याही याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.









