एमएलसी प्रकाश हुक्केरी यांचे स्पष्टीकरण
बेळगाव : आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पक्षाच्या हायकमांडकडून आदेश आल्यास बेळगाव अथवा चिकोडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी आहे, असे विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारला केंद्र सरकारकडून 15 व्या वित्त आयोगातून निधी मंजूर करावा. त्यासाठी अर्थमंत्र्यांची भेट घेऊन सदर निधी त्वरित मंजूर करावा यासाठी चर्चा केली आहे. गेल्या दोन वषर्पांसून बेळगाव-दिल्ली विमानसेवा बंद झाली होती. ती सेवा पूर्ववत सुरू करावी, यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली असून 1 ऑक्टोबरपासून सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच चिकोडी-गोटूर बायपास रस्त्यासाठीही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. यावर केंद्रीय मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद आला असून लवकरच या कामांना चालना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहात का? असे विचारले असता हा प्रश्न सर्वस्वी जिल्हा पालकमंत्री व पक्षाच्या हायकमांडकडे आहे. पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी आदेश दिला तर चिकोडी अथवा बेळगाव येथून निवडणूक लढवू. तसेच आमदार गणेश हुक्केरी यांनाही यासाठी तयार केले जाईल.









