महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा इशारा : सल्लागारांनी कामांची तपासणी करण्याची गरज
पणजी : पणजी स्मार्ट सिटीची कामे दिलेल्या तारखेला म्हणजे 31 मे पर्यंत पूर्ण व्हायला हवीत. ही बांधकामे निकृष्ट दर्जाची आढळून आल्यास सल्लागारांची बिले रोखण्यात येतील, कारण सल्लागारच या गोष्टीला थेट जबाबदार असतील, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले. मंगळवारी मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट सिटीच्या कामांबाबत बैठक झाली. त्यानंतर मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना वरील इशारा दिला. बैठकीस महापालिका, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच अन्य खात्यातील अधिकारी उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत सल्ला देण्यासाठी सल्लागारांना मोठी रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी कामे चांगल्या दर्जाची असतील, अशी खात्री करून घेणे आवश्यक आहे. कंत्राटदारांची बिले मंजूर करण्यापूर्वी सल्लागारांनी कामांची तपासणी करायला हवी. आजची बैठक या कामांच्या नियोजनासाठी होती. मुख्य सचिवांनी सर्व कंत्राटदारांना त्यांची कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. एका कामाची मुदत चुकली तर त्याचा परिणाम पुढील कामावर होतो. त्यामुळे कंत्राटदारांनी कामे वेळेत पूर्ण करावीत. मागच्या वर्षी पावसात काय झाले, याबाबत आज बोलायला नको. मात्र, पुन्हा अशी स्थिती येऊ नये, अशी प्रार्थना आपण देवाकडे करूया, असेही मंत्री मोन्सेरात यावेळी म्हणाले.









