साबांखामंत्र्यांचा अभियंत्यांना आदेश : ओटीएस योजनेला मुदतवाढ
प्रतिनिधी / पणजी

पाण्याची बिले भरण्यासाठी एक रकमी तडजोड (ओटीएस) योजनेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून ती आता 16 मार्चपर्यंत चालणार आहे. दोन महिन्यांचे पाणी बिल न भरल्यास साहाय्यक अभियंता (एई) आणि कनिष्ठ अभियंता (जेई) यांनी संबंधित ग्राहकाची नळजोडणी तोडण्याची कारवाई करावी, असे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी बजावले आहे. त्यांनी त्या कामात कुचराई केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा काब्राल यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक बांधकाममंत्री काब्राल यांनी सांगितले की, ओटीएस योजनेला आणखी मुदतवाढ मिळणार नाही. ग्राहकांनी या मुदत वाढीचा लाभ घेऊन आपापली थकबाकी जमा करावी, नाहीतर जोडणी तोडण्याशिवाय पर्याय राहाणार नाही, असे काब्राल यांनी नमूद केले. राज्यातील सुमारे 40 टक्के ग्राहकांचे पाणी बिल शून्य येते. त्यांना 16 घनमीटर पाणी मोफत देण्यात येत असल्याने बिल शून्य येते. त्यांचा प्रश्नच येत नसल्याचे काब्राल म्हणाले.
खात्यातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पाणी बिल न भरलेले सुमारे 52521 थकबाकीदार ग्राहक असून त्यांची हजारोंची बिले थकलेली आहेत. पाणी बिलाची एकूण 11 कोटीची थकबाकी शिल्लक असून ती वसूल होण्यासाठी ओटीएस योजना आखली आहे. एकूण 7296 जणांनी ओटीएस योजनेसाठी अर्ज केला आहे. काही जणांनी त्यांची थकबाकी भरली असून येत्या 2 महिन्यात जे बिल फेडणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा काब्राल यांनी दिला आहे.









