सातारा / दीपक प्रभावळकर :
“तरुण भारत”ने कर्णकर्कश डॉल्बी विरोधात घेतलेली भूमिका समाजाला हितकारक आहे. पालकमंत्री किंवा राज्य शासन म्हणून आमची सुरुवातीपासूनच कायद्याप्रमाणे भूमिका आहे. डॉल्बीविरोधात यंदा प्रक्षोभ लक्षात घेवून ज्या कोणत्या मंडळाचा आवाज वाढेल त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे निर्देश गुरुवार दि. 4 रोजी संध्याकाळीच मी निर्गमित करत आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची भूमिका सुद्धा कर्णकर्कश डॉल्बी विरोधात आहे. त्यामुळे प्रशासनाने सुद्धा कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून न घेता कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी तरुण भारतशी बोलताना दिले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज मुंबईतील मीडिया हाऊसेससह अनेक मंडळांच्या आरत्यांना उपस्थिती दर्शवली. यावेळीसुद्धा त्यांनी कर्णकर्कश डॉल्बीविरोधात आपली भूमिका स्पष्टपणे मांडत तरुण भारतच्या भूमिकेचे कौतुक केले.
- जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी कर्णकर्कश डॉल्बीच्या विरोधात
सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी कोणत्याच विषयावर एकत्र येत नाही हा ठपका यंदा मात्र धुवून निघाला. बहुतेक डॉल्बीवाले हे लोकप्रतिनिधींचे हस्तक नाहीतर उजवे, डावे कार्यकर्ते असतात. तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातील मंडळांना व कार्यकर्त्यांना नाराज करता येत नाही. या एकाच कारणामुळे डॉल्बीवाल्यांचे फावते. आणि फावलेले डॉल्बी कर्णकर्कश होतात. यंदा मात्र तरुण भारतने सुरू केलेल्या डॉल्बीविरोधी अभियानाला सर्वसामान्य जनतेकडून जसा प्रतिसाद मिळाला अगदी त्याच पद्धतीने या भूमिकेला सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही प्रतिसाद दिला. लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेचे आम्ही तरुण भारत म्हणून व्यक्तिश: आभार मानतोच. तसेच लाखो लोकही त्यांचे आभारी राहतील. मात्र आगामी दोन दिवस लोकप्रतिनिधींनी हा उधळलेला बेकायदेशीर डॉल्बीच्या वारूला लगाम घालून सामान्यांचे आशीर्वाद घ्यावेत, हीच श्री गणराया चरणी प्रार्थना.
- स्वतंत्र आदेश देण्याची गरज नाही, पोलीस दल सक्षम आहे-जिल्हाधिकारी
सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले असले तरी साताऱ्यामध्ये तसे स्वतंत्र आदेश काढण्याची गरज नाही. कलम 163 नुसार याची पूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असून याबाबत आमच्या स्वतंत्र तीन बैठका झाल्या आहेत. आवाज वाढवणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच निर्गमित झाले आहेत. सातारा पोलीस दल यासाठी कर्तव्यदक्ष आहे. याबाबत कोणती कसूर होणार नाही, अशा स्पष्ट सूचना मी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना दिले आहेत.
- प्रत्येक डॉल्बी चालकाला कडक सूचना अन् लेखी निर्देश दिले आहेत-पोलीस अधीक्षक तुषार दोशी
ग्रामीण भागातील डॉल्बी आणि म्युझिक सिस्टिमवाल्यांच्या सातारा, शाहूपुरी, कराड, फलटण, वाई या शहरांमध्ये तीन तीन वेळा बैठक घेवून कडक शब्दात सूचना केल्या आहेत. इतकेच नव्हे तर आवाजाची मर्यादा वाढली तर कोणकोणत्या कारवाया होतील याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यंदा कर्णकर्कश डॉल्बी ही संकल्पना साकार करण्यासाठी पोलिसांचा मोठा सहभाग असेल. गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. त्यामुळे उत्साहात साजरा करायला हवा. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने मंडळाने व डॉल्बीवाल्याने घ्यायला हवी असे आवाहनही त्यांनी केले.
- मोती चौकापासून 100 मीटर अंतरावर डॉल्बीला बंदी करा
शहरातील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या मोती चौकातील महत्वाची इमारत धोकादायक असल्याचा निर्वाळा सातारा पालिकेने दिला आहे. त्यामुळे सातारकरांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी मोती चौकापासून किमान 100 मीटर अंतरापर्यंत कोणत्याही मंडळाच्या डॉल्बीला म्युझिक सिस्टिमला बंदी आणावी याबाबत तरुण भारत कार्यालयात अनेक ज्येष्ठ नागरिकांची गुरुवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोती चौकापासून 100 मीटर अंतरापर्यंत डॉल्बीला बंदी घालण्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय आणि नगरपालिका यांना निवेदन देणार असल्याचे निश्चित केले आहे.
- आणखी एका गंभीर अपघाताला सातारा तयार आहे का?
सहा वर्षापूर्वी कन्या शाळेशेजारी प्रितम महाजनी यांची भिंत कोसळून एक अपघात झाला होता. त्यात काही माणसांवर मृत्यू ओढावला होता. आज हीच परिस्थिती गंभीर रुप धारण करून आहे. शहरातील राजपथ आणि खालचा रस्त्यावर सर्वात जास्त डॉल्बीचा दणदणाट मोती चौकात असतो. आणि सर्वात जास्त गर्दी आणि वाहतूक कोंडीही याच भागात असते. बहुतोलच्या इमारतीखाली हजारोंच्या संख्येने लोक आश्रयाला उभे असतात, अशा वेळी बरोबर मोती चौकातील श्रीराम दुग्धालय ही इमारत ‘डेंजरस, ही इमारत अत्यंत धोकादायक झाली असून इमारतीच्या परिसरात नागरिकांनी वावरु नये’, असा सातारा नगरपालिकेने मोठा फलक लावला आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या या अत्यंत संवेदनशील सूचनेचा शाहूपुरी पोलीस स्टेशन किती आदर ठेवणार आणि जिवीतांचे रक्षण करणार हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.








