रेशन धान्य दुकानांतील सडक्या तांदळांवर सरदेसाईंचा टोला : मुख्यमंत्री, कृषिमंत्री, कृषी संचालकांना दिले रेशनवरील तांदूळ
पणजी : अन्न पुरवठा खात्याच्या रेशन धान्य विक्री दुकानामध्ये सडका तांदूळ लोकांना पुरवला जातो. यावर सरकार काही उपाय काढण्यास पुढाकार घेत नाही. आपण दवर्ली येथील रेशन धान्य दुकानातून तांदूळ घेऊन आलो आहे. हा तांदूळ मुख्यमंत्री, कृषीमंत्री व कृषी संचालकांनी खाऊन पहावा, म्हणजे त्याचा दर्जा लक्षात येईल. तो जर बरा लागला, तर आपणासही जेवणाला बोलवा, असा उपरोधिक टोला आमदार विजय सरदेसाई यांनी काल बुधवारी विधानसभेत लगावला. नागरी पुरवठा खात्यातर्फे पुरवण्यात येणाऱ्या तांदळाचा मुद्दा उपस्थित करून आमदार सरदेसाई यांनी या खात्याच्या कारभारावर टीका केली.
कृषिमित्रांचे वेतन वाढवावे
राज्यातील शेतीचा प्रचार व प्रसारासाठी सक्रीय असलेल्या कृषिमित्रांचे वेतन 20 हजार ऊपयांवरून 25 हजार ऊपये करावे. काजू, आंबा, कोकम आणि अननस या फळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची मदत घ्यावी. राज्यातील 49 कृषिमित्रांना याकामी लावून त्यांच्याद्वारे शेती उत्पादनाच्या फायद्यासाठी प्रचार आणि प्रसाराचे काम करावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
कृषी धोरणाची माहिती द्यावी
राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रस्तावित कृषी धोरण नक्की कशाप्रकारचे असेल, याची तपशीलवार माहिती सरकारने विधानसभागृहात द्यावी. नागरिकांकडून आणि शेतकऱ्यांकडून अधिक चांगल्या पद्धतीच्या सूचना मागवाव्यात. तरच कृषी उत्पादनात 4 टक्के वाढ होऊ शकते, असेही सरदेसाई म्हणाले.
सेंद्रिय नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन
परंपरागत सेंद्रिय नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याबाबतही सरकारने स्पष्टता द्यावी. कृषी खात्यासाठी लागणारा चुना, अवजारे आणि यंत्रसामुग्री ही राज्यातील ठराविक लोकांकडून घेण्याचा खात्याचा आग्रह असतो. परंतु अशामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दुकानदार शेतकऱ्यांकडून विविध खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारतात. सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
सिक्कीमचा आदर्श घ्या
आपण कृषी मंत्री असताना सिक्कीम राज्याच्या कृषी मंत्र्यांकडून कृषी विकासासाठी माहिती घेतली होती. त्यांचे धोरण आणि तंत्रज्ञान याचा विचार करून राज्यात शेती विकासाचा पाया घातल्यास त्याचा शेतकऱ्यांना व राज्याला फायदा होणार आहे. सिक्कीम हे देशातील एकमेव सेंद्रिय शेती करणारे राज्य आहे. त्यामुळे गोवा राज्याने त्याचा आदर्श घेऊन कृषी धोरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
चुका दाखवणे माझे काम
नागरी पुरवठा खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त करताना विजय सरदेसाई यांनी सरकारवर विविध प्रश्नांची सरबत्ती करीत आपण लोकांचा प्रतिनिधी असल्याने ज्या ठिकाणी चुकीचे व्यवस्थापन चालते ते आपण दाखवून देत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
‘तरुण भारत’च्या वृत्ताची घेतली दखल
पालये पेडणे येथील एका महिलेची मरणानंतर अंत्यसंस्कारासाठी परवड झाल्याचे वृत्त दैनिक ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाल्याची माहिती आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत शून्य तासाला दिली. हे प्रकरण गंभीर असून सरकारने त्यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. या विषयी सरकार नवीन विधेयक आणणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. सरकारने यापूर्वी कायदा आयोगाची स्थापना केली होती. अॅड. रमाकांत खलप हे त्याचे अध्यक्ष होते. त्या आयोगाने या विषयावर काही शिफारशी सरकारला दिल्या होत्या. त्या मानून घ्याव्यात अशी सूचना सरदेसाई यांनी केली. मरणानंतर अंत्यसंस्कार आदराने झाले पाहिजेत, असेही ते म्हणाले.









