कसबा बीड/ प्रतिनिधी
महावितरण कंपनीकडून वारंवार शेतीपंपाची विज खंडित केली जाते. शेतकऱ्यांनी तक्रार केली तरी कर्मचारी व अधिकारी फोन उचलत नाहीत. या मागणीसाठी कोगे येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात आज महे, गणेशवाडी, कोगे, सावरवाडी येथील शेतीपंपधारक शेतकऱ्यांनी निवेदन दिले. विज विनाकपात न मिळाल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला.
शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे कि, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. असे असताना महावितरण कंपनीकडून वारंवार वीज खंडित केली जाते. शेतकऱ्यांनी तक्रार केली तरी कर्मचारी व अधिकारी फोन उचलत नाहीत. अगोदर १० तास मिळणारी विज ८ तास मिळत आहे. त्यामध्ये ही वेगवेगळ्या डीपी विविध कारणे सांगून दोन ते तीन तास बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. एप्रिल व मे महिन्यात शेतकऱ्यांना आपली पिकं वाचविण्यासाठी वीज हवी असताना याच महिन्यात विज मिळत नाही. भरीतभर म्हणून कोल्हापूर पाटबंधारे विभागाने सलग तीन दिवस उपसाबंदीचा आदेश लागू केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठं संकट आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी विज विनाकपात मिळावी. तसेच पाणी कपात करण्याचा निर्णय ताबडतोब रद्द करावा. अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर सचिन पाटील, बळीराम पाटील, गौतम पाटील, सुनिल पाटील, नवनाथ कोगेकर, ओंकार जरग, विठ्ठल इंगवले, भगवान पाटील, शिवाजी जाधव, निवास पाटील, पत्रकार नामदेव माने, बाळू वाघमारे, आनंदा पाटील, निवृत्ती नवाळे, अरूण पाटील, बाजीराव वाईंगडे यांच्या सह्या आहेत. यावेळी परिक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.