कोरोनादरम्यान प्रदीर्घ काळासाठी बहुतांश कंपन्यांमधील अधिकांश कर्मचाऱयांनी घरून काम केल्यानंतर आता सर्वच उद्योग-व्यवसायातील कामकाज-वातावरण पूर्वपदावर यायला लागले आहे. या बदलत्या व बदललेल्या व्यावसायिक स्थितीत कंपन्यांमधील कर्मचाऱयांच्या कामकाजविषयक अपेक्षांचे नवे स्वरुप प्रकर्षाने अनुभवास येत आहे. नव्याने व नव्या स्वरुपात उघडलेल्या कंपन्या कार्यालयांमध्ये काम करणाऱया व विशेषतः नव्याने नोकरी शोधणाऱया कर्मचाऱयांची मात्र अद्यापही घरून काम करण्यालाच विशेष पसंती असल्याची बाब प्रामुख्याने स्पष्ट झाली आहे.
यासंदर्भात करण्यात आलेल्या अभ्यासानुसार सद्यस्थितीत घरून काम करण्यावर आधारित रोजगारांना सुमारे दुपटीने वाढ झाली असून ही वाढ व टक्केवारी लक्षणीय स्वरुपात समजली जाते. मॉन्स्टर या रोजगार व्यवस्थापन कंपनीने केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार यावषीच्या सुरुवातीला घरून करता येण्याजोग्या रोजगारांचे प्रमाण 142 टक्के होते तर एप्रिलमध्ये अशा प्रकारच्या रोजगारांचे प्रमाण कमी होऊन 69 टक्क्मयांवर आले. सर्वेक्षणातून यासंदर्भात स्पष्ट झालेली बाब म्हणजे नव्या वर्षात म्हणजेच 2022 मध्ये व त्यातही पण एप्रिल 2022 पासून सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात बऱयाच कंपन्यांनी कर्मचाऱयांनी निव्वळ घरून काम करण्यापेक्षा गरजेनुरुप घरून व त्याच्याच जोडीला कार्यालयातून काम करण्याच्या संयुक्त म्हणजेच ‘हायब्रिड’ कार्यपद्धतीचा अवलंब सुरू केला आहे.
‘मॉन्स्टर’च्या अभ्यासानुसार गेल्या दोन वर्षात कर्मचाऱयांच्या काम आणि कामकाजाच्या संदर्भातील अपेक्षा आणि भूमिका या दोन्हीमध्ये मोठा व मुलभूत बदल झालेला आहे. सद्यस्थितीत नवा रोजगार शोधणारे कर्मचारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी म्हणजेच कार्यालयात काम करण्यास पसंती देताना कामाच्या ठिकाणचे सामूहिक वातावरण व कार्यपद्धती हे मुख्य कारण असते. या उलट घरून काम करणाऱया उमेदवार कर्मचाऱयांचा मुख्य भर हा त्यामुळे टाळला जाणारा रोजचा जिकिरीचा प्रवास व कौटुंबिक सोय यावर असतो.
कोविड-19 नंतरची 2020 व 2021 ही वर्षे व्यवसाय व कामकाज आणि नोकरी रोजगाराच्या संदर्भात उत्सुकता, अस्थिरतेसह राहिले. मात्र कोरोनानंतरच्या बदलत्या पार्श्वभूमीवर उद्योग व्यवसाय चक्र गतिमान झाले आहे. त्यामुळे कंपनीअंतर्गत कामकाजाला प्राधान्य मिळू लागले आहे. यावर एक तोडगा म्हणून संमिश्र कामकाज पद्धती विकसित होऊन त्याचा अवलंब केला असून भविष्यात त्याचा अधिक वापर आणि प्रसार होणे अपेक्षित आहे.
वर नमूद केल्यापैकी संमिश्र स्वरुपाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करणाऱया कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी या मोठय़ा कंपनीचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. कंपनीच्या ग्राहकाभिमुख सेवेवर आधारित व्यवसाय लक्षात घेता कोरोनाच्या तिसऱया टप्प्यानंतर म्हणजेच साधारणतः जानेवारी 2022 पासून आपल्या कर्मचाऱयांना आठवडय़ातून तीन दिवस कार्यालयात वा ग्राहक संपर्क कामासाठी देण्यास प्रोत्साहित केले. याकामी कंपनीच्या व्यवस्थापनासह व्यवस्थापकांनी विशेष प्रयत्न केले. कर्मचाऱयांचे शंकानिरसन केले. त्यांना धीर दिला. मुख्य म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱयांनी आरोग्याच्या जोडीलाच कंपनीचा व्यवसाय व आपल्या रोजगाराची कशी काळजी घेत काम करावे याविषयी मदतीसह मार्गदर्शन केले. कंपनी-कर्मचारी या उभयतांकडून संमिश्र स्वरुपात करण्याच्या उपक्रमाला चांगला व वाढता पाठिंबा मिळत गेला ही एक व्यावसायिक वस्तुस्थिती ठरली. यासाठी एकत्रित प्रयत्नांमुळेच आज केवळ हिंदुस्थान युनिलिव्हरच नव्हे तर अनेक कंपन्यांमध्ये आज संमिश्र कार्यपद्धती सकारात्मक स्वरुपात प्रस्थापित झाली असून अनेक ठिकाणी कर्मचारी त्याला वाढता प्रतिसाद देत आहेत.
संमिश्र कामकाज पद्धतीचा वाढता वापर व पसंती आणि त्यानुसार कंपनी- कर्मचाऱयांचे वाढते समर्थन मिळत असतानाच संमिश्र स्वरुपाचे कामकाज करताना कंपनी आणि कर्मचारी या उभयतांना येणारे अनुभव व त्याद्वारे होणारे फायदे यावर साधक-बाधक स्वरुपातील चर्चा आता विविध स्तरांवर होत आहे. या चर्चेतून पुढे येणारा एक समान व मुख्य मुद्दा म्हणजे कर्मचारी, सहकारी, अधिकारी या संस्थांमध्ये प्रत्यक्ष संपर्क संभाषणाचा फायदा त्यांच्या कामावर व काम योग्य व प्रभावीपणे होण्यावर होत असतो. समस्यांची सोडवणूक त्याद्वारे चांगली होते व म्हणूनच सध्याच्या स्थितीत संमिश्र कामकाज पद्धती व्यावसायिक कामकाजाच्या संदर्भात सर्वांनाच हवीशी ठरली आहे.
तंत्रज्ञान वा प्रकल्प विकास क्षेत्रात व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱया काही कंपन्यांनी तर एक वेगळीच व्यावसायिक शक्कल काढली आहे. त्यांनी आपले कर्मचारी, अधिकाऱयांना त्यांचे कामकाज आणि जबाबदारी यानुसार गरजेनुरुप कुठूनही काम करण्याची मुभा देत एक नवी कामकाज पद्धती विकसितच केली असे नव्हे तर अल्पावधीतच त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे हे विशेष.
‘कुठूनही काम’ या नव्या कार्यपद्धतीमध्ये कामाची गरज व व्यावसायिक आवश्यकतांनुसार ग्राहक संपर्क, चर्चा, व्यवसायासाठी आवश्यक प्रवास व भेटीगाठी इ. चा प्रामुख्याने समावेश असतो. यामुळे साध्य झालेल्या महत्त्वाच्या बाबी म्हणजे कर्मचाऱयांना कार्यालय वा घरुन काम करण्याशिवाय थेट व प्रत्यक्ष ग्राहकाकडे व त्यांच्या ठिकाणी जाऊन काम करता येते. परिणामी कर्मचाऱयांची कार्यक्षमता व उत्पादकता या दोन्हीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
बदलत्या स्थितीनुरुप कार्यालय उघडली आहेत वा उघडत आहेत. या बदलांनुरुप कंपन्या आपली धोरणे व कर्मचारी आपल्या कामगिरीमध्ये बदल घडवून आणत आहेत अशा कंपन्यांच्या व्यवस्थापनांनुसार या बदलांचे सकारात्मक फायदे व परिणाम दिसून येत आहेत. मुख्य म्हणजे या बदलांमुळे बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्वजण सक्षम होऊ शकले.
या बदलांमध्ये बदलत्या पार्श्वभूमीवर कंपन्यांमध्ये नव्याने येणाऱया वा येऊ घातलेल्या कर्मचाऱयांची भूमिका व निर्णय अर्थातच महत्त्वाचे ठरतात. यामध्ये कर्मचाऱयांची भूमिका व अपेक्षा प्रामुख्याने दुहेरी स्वरुपात दिसून येतात. काही कर्मचाऱयांच्या मते मर्यादित स्वरुपात का होईना पण घरुन काम करण्याची अपेक्षा निवडक कंपन्यांमधील कर्मचारी गेली 7-8 वर्षे तरी करीत आहेत. त्यानुसार बऱयाच कंपन्यांनी धोरणात्मक निर्णय घेतले व त्याची गरजेनुरुप अंमलबजावणी केली. थोडक्मयात म्हणजे कोरोनापूर्वीपासूनच ही भूमिका दिसून येते.
अर्थात कोरोनादरम्यान व त्यानंतर कर्मचाऱयांची मानसिकता व प्राथमिकता या दोन्हीमध्ये बदल झाले आहेत. रोजगाराएवढेच महत्त्व आज कर्मचारी आपले आरोग्य व कुटुंबाला देतात. हे मुद्दे कर्मचाऱयांनी त्यांच्या प्रचलित नोकरीत कायम स्वरुपी राहणे व नोकरी आणि कंपनी बदलणे यामागे कर्मचाऱयांच्या आशा अपेक्षा प्रमुख ठरतात. परिणामी कोरोनानंतर कार्यालये कामकाज आणि कर्मचाऱयांसाठी खुली होत असताना कंपनीची नोकरी स्वीकारतानाच कामाचेच नव्हे तर काम करण्याचे स्वरुप याबद्दल पण चिकित्सक बनले आहेत. नव्या व बदलत्या परिस्थितीने दिलेली ही एक नवी शिकवणच ठरली आहे.
-दत्तात्रय आंबुलकर








