मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत निर्णय : सर्व ते सहकार्य करण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही
बेळगाव : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीवेळी भाविकांना महाप्रसाद देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी घेतला. परंतु याला मनपातील काही नगरसेवकांनी विरोध दर्शवला. या कृतीबाबत हिंदू धर्मियांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून महापालिकेला महाप्रसाद करणे शक्य नसल्यास मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकवर्गणीतून महाप्रसाद करेल, असा निर्णय मंगळवारी आयोजित मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीवेळी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर होते. यावेळी बोलताना नेताजी जाधव म्हणाले, महापालिकेचे प्रतिनिधीत्व आम्हीदेखील अनेक वर्षे केले. परंतु असा प्रकार कधी घडला नव्हता. महाप्रसाद हा भाविकांसाठीच दिला जाणार असल्याने नगरसेवकांनी त्याचा बाऊ करू नये, माजी नगरसेवक म्हणून इतकीच विनंती आहे की, महाप्रसादाला नगरसेवकांनी विरोध न करता त्यासाठी सहकार्याची भूमिका गरजेची असल्याचे सांगितले.
नगरसेवकांच्या कृतीचा निषेध
जिल्हाधिकाऱ्यांनी महाप्रसादाचा निर्णय जाहीर करताना नगरसेवक, तसेच महानगरपालिकेला विचारात घेण्यात आले नसल्याचा आरोप करत काही नगरसेवकांनी विरोध केला. हिंदू धर्मियांमधून निवडून आलेल्या नगरसेवकांनी महाप्रसादाला विरोध दर्शविल्याने नगरसेवकांच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. नागरिकांच्या पैशांवर इंदूर, तसेच इतर दौरे चालतात. मग महाप्रसाद करण्यास विरोध का? असा उलट प्रश्न करण्यात आला. रमाकांत कोंडुस्कर यांनी प्रथमत: जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेतील काही नगरसेवकांनी विरोध केला. परंतु आपण कोणाच्या मतांवर निवडून आला याचा विचार पहिल्यांदा करा, मगच गणेशोत्सवाच्या महाप्रसादाला विरोध करा, असा सल्ला दिला. स्मार्ट सिटी, तसेच इतर विकास प्रकल्पांमध्ये करोडो रुपयांचा चुराडा झाला. त्यावेळी या नगरसेवकांना शहाणपण आले नव्हते का? असा प्रश्न त्यांनी केला. तसेच गणेशभक्तांचा अपमान केल्याबद्दल महापालिका बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील, सेक्रेटरी आनंद आपटेकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अंकुश केसरकर, सागर पाटील, संजय जाधव, बळवंत शिंदोळकर, दत्ता जाधव, सुहास चौगुले यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांची घेतली भेट
महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय सर्वसामान्य गणेशभक्तांचा विचार करून घेतला असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना याबाबतची खरी माहिती आपण द्यावी, अशी मागणी महामंडळातर्फे करण्यात आली. आपण जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
महामंडळाचे राज्यपाल-मुख्यमंत्र्यांना पत्र
मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन बेळगाव व शहापूर येथे अनंत चतुर्दशीदिवशी महाप्रसाद वितरणाची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विसर्जन मिरवणुकीदिवशी महाप्रसाद करण्याची घोषणा केली. याला महानगरपालिकेतील काही नगरसेवक व महापौरांनी विरोध केला आहे. परंतु सर्वसामान्य व गरीब भाविकांना महाप्रसाद मिळावा या भावनेने जिल्हाधिकाऱ्यांनी महाप्रसादाची योजना आखली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्र महामंडळाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठविले आहे.
विसर्जन मिरवणुकीदिवशी महाप्रसाद होणार“
एक साधा प्रश्न माझा,
लाख येती उत्तरे,
हे खरे की ते खरे,
ते खरे की हे खरे
याची प्रचिती सध्या बेळगावकरांना येत आहे. वास्तविक गणरायांचे आगमन ही अत्यंत आनंदाची बाब. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विसर्जन मिरवणुकीदिवशी मिरवणूक पहायला येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करणार असल्याचे जाहीर केले. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे गणेश महामंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी आपला हा विचार बोलून दाखविला होता. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांच्याशी चर्चाही केली होती. माध्यमांना त्यांनी माहिती दिली. एक परधर्मीय अधिकारी गणेशोत्सवाबाबत असा स्वागतार्ह निर्णय घेऊ शकतात, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुकच झाले. परंतु काही नाराज नगरसेवकांनी हा निर्णय आम्हाला विश्वासात न घेता जिल्हाधिकारी कसा घेऊ शकतात? असे म्हणत विरोध केला आणि प्रसादाबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले.
दरम्यान भाविकांसाठी नाहीतर मनपा कर्मचाऱ्यांसाठी महाप्रसाद दिला जाईल, असेही सांगण्यात आले. तर महाप्रसाद वादग्रस्त ठरणार असेल तर तो मुद्दाच नको, अशाही चर्चा सुरू झाल्या. वास्तविक हा निर्णय स्वागतार्ह होता. त्याला राजकारणाची जोड देण्याची गरजही नव्हती. विरोधाची धार पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत मौन बाळगणे पसंत केले. दरम्यान गणेश महामंडळानेच महाप्रसाद देण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्र्यांनी याबाबत मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकारी, तसेच महापालिका आयुक्तांकडून सर्व माहिती जाणून घेतली व आपण सर्व ते सहकार्य करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता विसर्जन मिरवणुकीदिवशी प्रसाद वितरण होणार हे नक्की.









