मराठा जागृती संघातर्फे आयोजित सत्संग कार्यक्रमात जगद्गुऊ परमपूज्य मंजुनाथ स्वामींचे विचार
बेळगाव : एका जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राष्ट्रीय नायक निर्माण केला. जर अशी मातृशक्ती एक झाली तर या देशाचे कल्याण होण्यास वेळ लागणार नाही. भक्तिमय जगात पांडुरंग भजनातून भेटतात. साधू संतांनी कधीही पैशाला महत्त्व दिले नाही. उलट आपल्याकडे जे आहे ते समाजासाठीच दिले, असे विचार मराठा जगद्गुऊ परमपूज्य मंजुनाथ स्वामी यांनी व्यक्त केले. मराठा जागृती संघाच्यावतीने बुधवारी सायंकाळी पटवर्धन लेआऊट येथील बागेमध्ये आयोजित केलेल्या सत्संग कार्यक्रमात ते बोलत होते.
400 हून अधिक महिलांची उपस्थिती
शंकर पाटील यांनी शिकवून तयार केलेल्या 20 हून अधिक भजन संघाच्या 400 हून अधिक महिला उपस्थित होत्या. स्वामीजींच्या आगमनापूर्वी एक तास अगोदर त्यांनी भजनाचा कार्यक्रम केला. स्वामीजींचे आगमन झाल्यावर स्वामीजींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन केले. संघाचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी व्यासपीठावर मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, अनंत लाड, शंकर चौगुले, शंकर पाटील, वर्षा बिर्जे, जयदीप बिर्जे आदी उपस्थित होते.
भजने सादर केल्याने भक्तिमय वातावरण
सुमारे अडीच तासांच्या कार्यक्रमात स्वामीजींनी अनेक भजने सादर करून वातावरण भक्तिमय केले. तुकोबारायांनी भगवंतावर जे प्रेम केले, जी भक्ती केली ती अनन्यसाधारण अशीच होती. मला पुन्हा पुन्हा जन्म दे पण प्रत्येक वेळी मला तू तुझा भक्त होऊ दे आणि तू देव रहा अशीच मागणी त्यांनी पांडुरंगाकडे केली. अभंग हाच माझा गुरू या विचारधारेतून जीवनाची वाटचाल करणारी माणसे कोणाकडे कशाची अपेक्षा करीत नाहीत. संत हे जगाला मार्गदर्शन करतात, असे ते म्हणाले. भजन मार्ग आध्यात्माचा महामार्ग असून, शंकर पाटील यांनी शेकडो महिलांना या भक्तिमार्गाकडे आणले हे फार मोठे कार्य आहे, असे कौतुगोद्गार त्यांनी काढले. सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले. तबला साथ संदीप देवरी, कोल्हापूर आणि हार्मोनियम साथ चंद्रज्योती देसाई यांनी केली.









