नागरिकांचे बांधकाम खात्याला निवेदन : 27 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको
खानापूर : हलशी-नागरगाळी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे. हलशी ते नागरगाळी हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. जोरदार अतिवृष्टीमुळे रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून डबक्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. गेल्या दोनवर्षात या रस्त्यावर झालेल्या अपघातात आठजणाना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. येत्या काही दिवसात या रस्त्याच्या बांधकामाचे काम हाती न घेतल्यास 27 ऑक्टोबर रोजी नागरगाळीजवळील रामनगर-अळणावर रास्ता रोको करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. दिला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची देखभाल झाली नसल्याने संपूर्ण रस्ताच उद्ध्वस्त झाला आहे. हलशी ते नागरगाळीपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी 5 कोटीचा निधीही मंजूर केला होता.
मात्र कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने या रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे. वेळोवेळी रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात अर्ज, विनंत्या करुनदेखील सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधीनीही याबाबत गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सदर रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. गेल्या दोन वर्षात या रस्त्यावरुन प्रवास करताना आठजणाना जीव गमवावा लागला आहे. मात्र संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधीनी अजिबात गांभीर्याने घेतले नसल्याने या भागातील नागरिकांना धोका पत्करुन या रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. यासाठी या भागातील नागरिकांनी रस्त्याचे बांधकाम येत्या काही दिवसात सुरू न केल्यास 27 ऑक्टोबर रोजी रामनगर-अळणावर रस्त्यावर नागरगाळी येथे रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. अशा आशयाचे निवेदन बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, माजी आमदार अंजली निंबाळकर, खासदार विश्वेश्वर हेगडे, आमदार चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.









