अत्याधुनिक भूमिगत कचराकुंड्यांची सुविधा : मनपाला शहरवासियांच्या सहकार्याची अपेक्षा
प्रतिनिधी /बेळगाव
रस्त्याशेजारी असलेल्या खुल्या जागेत कचरा टाकू नका, असे आवाहन करून देखील कचरा टाकला जातो. त्यामुळे अत्याधुनिक भूमिगत कचराकुंड्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कचराकुंड्या किती प्रमाणात भरल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती दररोज मनपाच्या अधिकाऱ्यांना आणि स्मार्ट सिटी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरला प्राप्त होत आहे.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. रस्त्याशेजारी आणि खुल्या जागांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन वेळोवेळी केले जाते. तरीदेखील नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत असल्याने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नजर ठेवण्यात आली. आणि कचराकुंडीच्या ठिकाणी रंगरंगोटी व सुशोभिकरण करून कचरा टाकू नये, याकरिता असे विविध उपक्रम राबविण्यात आले. तरीदेखील शहरवासियांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला नाही. शहरातील रस्ते स्मार्ट बनवून कचराकुंड्या हटविण्यात आल्या. तरीदेखील अस्वच्छता निर्माण होत आहे. रस्त्याशेजारी कचरा टाकण्याचे प्रमाण सुरू असल्याने अत्याधुनिक पद्धतीच्या भूमिगत कचराकुंड्या बसविण्यात आल्या आहेत.
ग्रंथालयाजवळ भूमिगत कचराकुंडी
प्रारंभी प्रायोगिकतत्वावर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाशेजारील ग्रंथालयाजवळ भूमिगत कचराकुंडी बसविण्यात आली होती. त्यानंतर नव्याने 17 ठिकाणी भूमिगत कचराकुंड्या बसविण्यात आल्या आहेत. या कचराकुड्या उचलण्यासाठी क्रेन असलेले वाहन देखील महापालिकेने खरेदी केले आहे. ऐरवी कचराकुंड्या भरून वाहिल्या तरी कचऱ्याची उचल करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे अत्याधुनिक कचराकुंड्यांना सेन्सर बसविण्यात आले आहेत. कुंडीमध्ये किती प्रमाणात कचरा आहे. याबाबतचा मॅसेज दररोज सकाळी आणि संध्याकाळी स्मार्ट सिटीच्या कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरला आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्राप्त होतो.
कचराकुंडी पूर्ण क्षमतेने भरल्यास त्याबाबतची माहिती देखील मनपा अधिकाऱ्यांना व कमांड सेंटरला मिळते. त्यामुळे कचराकुंड्या भरून वाहू लागल्यास कचऱ्याची उचल करण्याचे काम सोयीस्कर झाले आहे.
महापालिकेने बसविलेल्या 18 भूमिगत कचराकुंड्यांचा वापर सुरू झाला आहे. तरीदेखील काही नागरिक कुंडीशेजारी कचरा टाकत असल्याचे निदर्शनास येत आहे. अत्याधुनिक सुविधांचा व तंत्रज्ञानाचा वापर करून शहरवासियांना चांगली सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. मात्र याकरिता शहरवासियांच्या सहकार्याची जोड आवश्यक असल्याची अपेक्षा मनपाच्या अधिकाऱ्यांची आहे.









