माजी आमदार अमल महडिक : खोची येथे सत्ताधारी आघाडीची प्रचार सभा
कोल्हापूर प्रतिनिधी
सत्ताधारी आघाडीने छत्रपती राजाराम कारखाना हा गेली सत्तावीस वर्ष सभासदांच्या मालकीचा ठेवला आहे. कारखाना विरोधकांच्या हातात गेल्यास ते राजाराम कारखाना डी. वाय. पाटीलचे युनिक क्रमांक दोन केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा आरोप माजी आमदार अमल महाडिक यांनी विरोधकांवर केला. तसेच हि गंभीर बाब ओळखून सभासदांनी या निवडणुकीतही सत्ताधारी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन केले. सत्ताधारी आघाडीची खोची येथे प्रचार सभा झाली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अमल महाडिक बोलत होते. अध्यक्षस्थानी दिलीपराव सूर्यवंशी होते.
माजी आमदार महाडिक म्हणाले, सत्ताधारी आघाडी सत्त्याची बाजू घेऊन सभासदापुढे जात आहे. ज्या दिवशी विरोधी गटाने कारखान्याच्या 1899 सभासदावर गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला तोच दिवस काळा दिवस म्हणून कारखान्याचा इतिहासात नोंदवला गेला आहे. सत्ताधारी आघाडी सभासदांचा हित विचारात घेऊन सत्याची लढाई करत आहे. पण विरोधक मात्र सभासदांच्या पाठीशी आहेत, अशी खोटी वल्गना करत असल्याचा आरोप महाडिक यांनी केला.
ते पुढे म्हणाले, कारखान्याकडून कोणतेही उपपदार्थ घेतले जात नाहीत, तरीही इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसाला दर दिला आहे. हे विरोधकांना दिसत नाही. आम्ही विरोधकांना काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती ती त्यांना देता आली नसल्यामुळे ते खोटी आश्वासने व बेतालपणे बोलत आहेत. सभासद हे जाणत आहेत. गोकुळचे कर्मचारी कारखान्याच्या प्रचारात उतरवून हुकूमशाही सुरू केली आहे. हे सर्व थांबवण्यासाठी सत्ताधारी आघाडीला बळ द्या, असे आवाहन महाडिक यांनी केले.
माजी चेअरमन शिवाजीराव पाटील म्हणाले, ज्यावेळी सभासदांवर नैसर्गिक संकटे आली त्यावेळी तुम्ही कुठे होता? निवडणूक लागताच सभासदांचा पुळका आल्याचे नाटक विरोधकांना सुरु असल्याचा आरोप पाटील यांनी केला. यावेळी दीपकराव पाटील, वसंतराव गुरव, विजयसिंह पाटील, काकासाहेब चव्हाण, जगदीश पाटील, अमरसिंह पाटील, सयाजी पाटील, अरूण पाटील, विजयसिंह पाटील, सदाशिव कुलकर्णी, वसंतराव गुरव, विनोद शिंगे, काकासाहेब चव्हाण, संतोष माळी, विजय पाटील, शशिकांत मगदूम आदी उपस्थित होते.