एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मंडपातील खुर्च्या रिकाम्या रहात असतानाच चिपळुणातील लोककला महोत्सवातील मंडप मात्र ओसंडून वाहताना दिसत आहे. हे चित्र सुखद असले तरी दिवसेंदिवस लोप पावलेल्या कलेला संजीवनी द्यायची असेल, मोबाईलमध्ये मान घुसवून बसलेल्या पिढीला बाहेर काढायचे असेल तर आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढवायचे असेल तर लोककला जिवंत रहायला हवी हे ओळखूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोककला विस्तार महामंडळाची केलेली घोषणा पालघर ते सिंधदुर्गपर्यंतच्या लोककला आणि लोककलांकारांसाठी आशेचा किरण ठरणारी आहे.
कोकण ही निसर्गसंपन्न भूमी आहे. अथांग समुद्र किनारा, गर्द वनराई, गिरीदुर्ग, प्राचीन मंदिरे, वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ, परंपरेने जपलेल्या लोककला आणि सांस्कृतिक संचिताने युक्त कोकण भूमीचे अनेकांना आकर्षण आहे. या कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत रविवारपासून पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव सुरू आहे. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्राच्या वतीने भरवण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणातील लोककला ठळकपणे जगभर पोहचाव्या, देश-विदेशातील पर्यटक कोकणात यावेत यासाठी हा लोककला महोत्सव हातभार लावेल, असा विश्वास व्यक्त केला. याचवेळी कोकणासह संपूर्ण राज्यातील लोककला, संस्कृती जपण्यासाठी सरकार कटीबध्द असून त्यासाठी लोककला विस्तार महामंडळ स्थापन करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी, विविध पक्षांचे राजकीय प्रतिनिधी एकाच व्यासपिठावर आल्याचे सांगून राजकारणीही चांगले कलाकार असल्याचे सांगितले. लोककलांना राजाश्रय मिळावा, ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगताना लोककलांविषयी अत्यंत परखड शब्दात मत मांडले. लोककलांमध्ये आधुनिकता येणे चांगले आहे. परंतु त्यातील वाढती अश्लिलता थांबणे आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. लोककला हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम असताना त्यात अश्लिलता आणून नेमकी काय जनजागृती करणार, याचा प्रत्येक कलाकाराने विचार करायला हवा. कोकणातील लोककलाकार एकत्र यायला हवेत, पण त्याला राजकीय स्पर्श होता कामा नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी अनेक लोककला लोप पावत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. लोककला जपण्यासाठी कोकण लोककला महामंडळ स्थापन झाले नाही तर नेहमीप्रमाणे कोकणच्या वाटय़ाला आश्वासनापलीकडे काहीच न येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. केवळ खडीकरण, डांबरीकरण म्हणजे विकास नाही, लोककला, संस्कृती जपण्याचे कामही सरकारने करायला हवे, कलाकार मानधनाचे नियम शिथिल व्हावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली.
कोकण सांस्कृतिक परंपरा आणि लोककलेने समृद्ध आहे. कोकणातील होळी आणि गणेशोत्सवाशी बहुतांश पारंपरिक लोककला निगडीत आहेत. कोकणभूमीतील लोककलांचे वैविध्य पाहता बदलत्या काळात ‘पर्यटन’ अंगाने विचार करता या साऱयाची ‘मूल्यवृद्धी’ होऊन लोककलांना ‘राजाश्रय’ मिळायला हवा आहे. त्यादृष्टीने भव्य उत्सवी वातावरणात लोककलांचे वैविध्य समूहमनावर बिंबवण्याची गरज आहे.
दशावतारी नाटके, अनेक सोंगे घेऊन येणारे ‘नमन’, शक्तीतुरा, शिमगा पालखीतील ग्रामदेवतेचे मुखवटे, प्रतिमा आणि त्याला जोडलेली विशिष्ठ तालावर पालखी नाचवणारी लोकनृत्ये, संकासूर-गोमू, मनाला नवी ऊर्जा देणारी, उजव्या पायात चाळ बांधून भरजरी कपडय़ांनी सजलेली पारंपरिक सामूहिक नृत्याचा अविष्कार असलेली जाखडी आदी सारे इथल्या लोककलेचे अविष्कार आहेत. पालखी नाचवणे हा नृत्याचा अभिनव प्रकार फक्त कोकणातच पहायला मिळतो. पालघरमधील आदिवासी पावसाला विनवणी करणारा ‘कांबड’ नाच (कांबडय़ा) करतात. कोकणात मासेमारी करणाऱया गाबीत समाजात घुमटाचा फाग हा लोककलेचा नाटय़प्रकार प्रसिद्ध आहे. कोकणातील चित्रकथी-कळसूत्री बाहुल्यांनी ‘पद्म’ सन्मान मिळवला आहे. पण याही पलिकडे कोकणात गोंधळी, गज्जानृत्य, सापाड, चित्रकथी, तारफा, घोरनृत्य, काटखेळ, नकटा, डेरा, घोरीप आदी असंख्य लोककला आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्या कलांना, कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या महोत्सवात करण्यात आले. यापुढेही असे महोत्सव अपेक्षित आहेत.
बहुविध लोककलांनी कोकण भूमी संपन्न आहे. कालानुरूप यातील काही लोककला लोप पावत आहेत. अंधश्रद्धा बाजूला सारून सकस, प्रयोगात्मक लोककला जीवंत राहण्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. कोकणातील गणेशोत्सवात ‘जाखडी’ नृत्य म्हणजे शक्तीतुरा इथल्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्टय़ ठरावे. नमन, दशावतारात देवतांचे मुखवटे धारण करून त्यांची पूजा केली जाते. परमेश्वराची महती गाऊन कृपा संपादन करणे हा या मागचा हेतू असतो. प्रत्येक गावात लोककलावंतांचे देवाचे खेळे असतात. आपल्या चित्रपटसृष्टीने असंख्य अभिनेते पाहिलेत. पण कोकणात विशेष कोणतेही शिक्षण न घेता अनुभव आणि अवलोकनातून प्रामाणिकपणे लोककला सादर केली जाते. कोकणभूमीने शतकानुशतके जोपासलेला लोककलेचा हा गाभा या महोत्सवात अनुभवता आला.
संपूर्ण कोकणभूमी जशी स्वर्गीय निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तशीच ती कलावंतांची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. इथल्या कलाकारांची साहित्य, कला, रंगभूमीशी घट्ट नाळ जुळलेली आहे. चित्रपट अंगाने याचा मेळ साधला जायला हवा आहे. कोकणी माणसाचा मूळ पिंड कलेचा आहे. त्यातही हा माणूस नाटकवेडा आहे. कोकणात चित्रपटनिर्मितीला पोषक वातावरण आहे. कोकणात कलाकारांना चित्रपटविषयक किमान जुजबी प्रशिक्षण मिळायला हवे. पर्यटन अणि लोककलेचा अभ्यासक धीरज वाटेकर याने यावर एक छानसे उदाहरण दिले आहे. ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटात कर्नाटकातील एका ग्रामदेवतेची सेवा करणारा सेवेकरी, गावकरी आणि जमीनदार यांच्यातील संघर्ष आहे. विशेष म्हणजे यातून कर्नाटक राज्याच्या दक्षिण जिह्यातील किनारपट्टीवरील ‘कोला’ उत्सवासह ‘भूता कोला’ प्रथा-परंपरा यांचे अचूक चित्रण घडले आहे. अशा लोककला कोकणातही खूप आहेत. उत्सवी वातावरणात, जनमानसाच्या पाठबळावर त्या तग धरून राहिल्या तर त्यांवरही भविष्यात प्रकाश पडू शकेल. पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणानंतर कोकणाचे सौंदर्य आणि चित्रपटसृष्टी हातात हात घालून चालू लागली तर इथल्या लोककलावंतांना चांगले दिवस येतील. तोवर या मंडळींनी तग धरणे आवश्यक ठरणार आहे.
राजेंद्र शिंदे








