ग्रामीण भागातील चित्र : बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा दैनंदिन प्रवास संघर्षमय, विद्यार्थ्यांचेही हाल
बेळगाव : शक्ती योजना सुरू झाल्यापासून बससेवेचे अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे शक्ती योजनेचा बोजा सोसेना अन् बससेवा सुरळीत होईना, असे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. प्रवाशांचा दैनंदिन प्रवास संघर्षमय होवू लागला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. त्यामुळे बसचा प्रवास सर्वत्र चेंगराचेंगरीत व लोंबकळत सुरू आहे. परिणामी, सर्वसामान्य प्रवाशांना शक्ती योजना डोकेदुखी वाढवणारी ठरू लागली आहे. ग्रामीण भागात 150 हून अधिक बसेस विविध गावांना धावतात. मात्र, शक्ती योजना सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे बससेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी, काही गावांची बससेवा ठप्प झाली आहे. तर काही गावच्या बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. या बसफेऱ्यांमध्ये प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. विद्यार्थ्यांकडे बसपास असूनही खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. शक्ती योजनेमुळे बससेवेवर मोठा ताण वाढला असून सर्वत्र बस फेऱ्या कमी होताना दिसत आहेत.
ग्रामीण भागातून शहरात बाजार, शाळा, महाविद्यालय आणि इतर नोकरी, उद्योगासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत बसफेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना चेंगराचेंगरी करून प्रवास करावा लागत आहे. दरवाज्यात लोंबकळत धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिवहनच्या प्रवासाबाबतही प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. सुरक्षित प्रवास म्हणून परिवहनच्या बसला प्राधान्य दिले जाते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत परिवहनच्या बसचा प्रवास धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे काही प्रवाशांना खासगी वाहनांचा प्रवास आरामदायी वाटू लागला आहे. त्यामुळे प्रवाशी खासगी वाहनांना प्राधान्य देत आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत जागा पकडण्यासाठी शर्यतीप्रमाणे प्रवासी बसच्या पाठीमागे धावू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. बसफेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याबाबत विविध ठिकाणी रास्तारोको करून परिवहनकडे जादा बसेससाठी मागणी करण्यात आल्या आहेत. मात्र, परिवहनच्या ताफ्यात अतिरिक्त बस नसल्याने उपलब्ध असलेल्या बसेसवर गाडा सुरू आहे. वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत बसफेऱ्या अगदी नगण्य असल्याने दिवसेंदिवस परिवहनच्या बसचा प्रवास अतिधोक्याकडे जाताना दिसत आहे.
मुक्कामाच्या बसेसही बंद
काही गावच्या मुक्कामाच्या बसेसही बंद झाल्या आहेत. त्यामुळे रात्री उशीराने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. शिवाय पहाटे निघणाऱ्या बसेस देखील बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होवू लागले आहेत. याचबरोबर विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांनी बसपाससाठी परिवहनला आगाऊ रक्कम दिली आहे. मात्र, सुरळीत बस नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे बसपाससाठी दिलेले पैसे वाया गेल्याची खंतही विद्यार्थ्यांतून व्यक्त होत आहे.
अपुऱ्या बसेसचा फटका
अतिवाड गावची रात्री मुक्कामासाठी येणारी बस आणि पहाटे गावातून शहराकडे जाणारी बस बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होवू लागले आहेत. तर वाहनाची सोय नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. अपुऱ्या आणि अनियमित बससेवेचा विद्यार्थी वर्गाला फटका बसू लागला आहे.
सुरेश सावंत, पालक









