पुणे / प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतरही या आरोपासंदर्भात कारवाई का झालेली नाही? पंतप्रधानांच्या वक्तव्याची नोंद झालेली असते. यंत्रणा त्याअनुषंगाने तपास करीत असतात. कारवाई होत नसेल, तर पंतप्रधानांनी खोटे आरोप केले, असा अर्थ निघतो. सरकारने दहा दिवसांत गुन्हा दाखल न केल्यास पंतप्रधानांचा खोटेपणा जनतेसमोर मांडू, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिले. आरोप खोटे असतील, तर मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि शरद पवारांची माफी मागावी, असा टोलाही त्यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, मी राज्यसभेचा खासदार असताना एमटीएनएल घोटाळा उघडकीस आला होता. आरोप झालेल्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली. टूजी स्पेक्ट्रम घोटाळय़ाचा आरोप करून भाजप सत्तेवर आला. सरकारने पुरावे न दिल्याने आरोपी मुक्त झाले. याबाबतीत न्यायालयाचा निकाल पुरेसा बोलका आहे. महाधिवक्त्यांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान खोटे आरोप करतात काय? राजकीय फायद्यासाठी विविध राजकीय पक्षांची बदनामी केल्याबद्दल मोदी यांनी राजकीय पक्षांची माफी मागावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. धाकधपटशहा दाखवून राजकीय पक्ष संपुष्टात आणणे धोकादायक आहे. राजकीय पक्ष संपणार असतील, तर ही व्यवस्था चालवणार कोण? तपास यंत्रणांची भीती दाखवून पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
इंडिया आघाडीत प्रादेशिक पक्षांचे स्थान काय?
विरोधकांच्या इंडिया आघाडीत सहभागी होणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, प्रकाश आंबेडकर म्हणाले, राजकीय पक्ष देशव्यापी असले, तरी देशव्यापी राजकारण संपले आहे. विविध राज्यांना राष्ट्रीय पक्षांची गरज उरलेली नाही. हा बदललेला राजकीय पट इंडिया आघाडी विचारात घेणार आहे का? इंडिया आघाडीने मणिपूर प्रश्न गंभीरपणे मांडलेला नाही, असा आरोपही आंबेडकर यांनी या वेळी केला.